

Why was Benjamin Netanyahu son Avner Netanyahu's wedding postponed Iran missile attack Israeli hostages Gaza
तेल अवीव : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर, इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांचा धाकटा मुलगा अवनेर नेतान्याहूचे लग्न पुढे ढकलले आहे. The Times of Israel या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
अवनेर नेतान्याहू आणि त्याची प्रेयसी अमित यार्डेनी यांचे लग्न सोमवारी (16 जून) होणार होते. मात्र इस्रायलमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर तसेच या लग्नसोहळ्याला जनतेतून विरोध होऊ लागल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
गाझामधील इस्रायली बंदिवान अजूनही सुटलेले नाहीत, अशा स्थितीत नेतान्याहू कुटुंब विवाहसोहळा साजरा करीत असल्यामुळे जनतेत संताप निर्माण झाला. अनेक विरोधी संघटनांनी या लग्नाच्या ठिकाणी निदर्शने करण्याची तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
किब्बुत्स याकुममधील 'रोनिट्स फार्म' या आलिशान वेडिंग व्हेन्यूच्या सभोवताली 100 मीटरच्या परिघात लोखंडी अडथळे व काटेरी तारांचे कुंपण लावण्यात आले होते. शिवाय, या परिसरात 1.5 किमीच्या परिघातील हवाई क्षेत्रही बंद करण्यात आले होते, फक्त पोलिस हेलिकॉप्टर्सना परवानगी देण्यात आली होती.
अवनेर नेतान्याहू हे बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा नेतान्याहू यांचे धाकटे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1994 रोजी जेरुसलेममध्ये झाला.
अवनेर यांनी हिब्रू विद्यापीठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर इस्रायल संरक्षण दलात (IDF) सेवा बजावली. सेवेनंतर, त्यांनी IDC हर्जलिया येथे तत्त्वज्ञान विषयात उच्च शिक्षण घेतले. सध्या ते फ्लोरिडामधील हॅलंडेल बीच येथे राहतात.
तर अमित यार्डेनी (वय 26) ही अवनेर याची प्रियसी आहेत. अमित हीने 2015 मध्ये इस्रायलच्या लष्करात तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली. लष्करी सेवेनंतर तिने रेखमन विद्यापीठात संगणक शास्त्र विषयात शिक्षण घेतले.
तिला साहसी खेळ आवडतात. तिने 'निंजा इस्रायल' या टेलिव्हिजन कार्यक्रमात भाग घेतला होता. अमित आणि अवनेर 2022 पासून डेट करत आहेत. सुरवातीला हे दोघे 26 नोव्हेंबर 2024 रोजी लग्न करणार होते पण सुरक्षा कारणांमुळे ते पुढे ढकलले गेल्याचे कळते.
इस्रायली पोलिसांनी रविवारी सांगितले की, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान 10 लोकांचा मृत्यू झाला असून 180 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच सात लोक अजूनही बेपत्ता असून ते ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इस्रायलने नुकताच इराणवर मोठा हल्ला केला होता, ज्यात त्यांचे अणुउद्योग, लष्करी तळ व वरिष्ठ नेते यांना लक्ष्य करण्यात आले होते. याला प्रत्युत्तर म्हणून ईरानने क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. त्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या सायरनचा आवाज घुमू लागला आणि लोकांना आश्रयस्थळी जावे लागले.
या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी Truth Social या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे की, "जर इराणने इस्रायलवर कोणत्याही स्वरूपात हल्ला केला, तर अमेरिकेचे संपूर्ण सैन्य शक्तीने प्रत्युत्तर देईल. मात्र आम्ही इराण व इस्रायलमधील संघर्ष थांबवण्यासाठी करार करू शकतो." असेही ते म्हणाले.