

Walmart Job Cuts
अमेरिकेतील रिटेल कंपनी वॉलमार्टने नोकरकपात करण्याची योजना आखली आहे. ही कंपनी १,५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहे. कंपनीच्या व्यापक पुनर्रचना प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही नोकरकपात केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या अंतर्गत मेमोनुसार, त्यांचे कामकाज सुस्थितीत करण्याच्या उद्देशाने नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या नोकरकपातीचा वॉलमार्टच्या जागतिक तंत्रज्ञान विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, अमेरिकेतील स्टोअर्सचे ई-कॉमर्स ऑपरेशन्स, जाहिरात युनिट आणि वॉलमार्ट कनेक्टवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
काही पदे कमी केली जाणार आहेत. तर कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत नवीन पदांची निर्मिती केली जाणार असल्याचे समजते.
वॉलमार्ट ही अमेरिकेच्या रिटेल विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. यात सुमारे १६ लाख कर्मचारी काम करतात. तर जगभरातील सुमारे २१ लाख लोकांना ही कंपनी रोजगार देते. ही देशातील सर्वात मोठी आयातदारदेखील आहे. त्यांच्या ६० टक्के वस्तू चीनमधून येतात. त्यात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि खेळण्यांचा समावेश आहे.
फेब्रुवारीत वॉलमार्टने उत्तर कॅरोलिनामधील त्यांचे कार्यालय बंद केले होते. त्यानंतर त्यांनी येथील कर्मचाऱ्यांची बदली कॅलिफोर्निया आणि आर्कान्सामधील त्यांच्या प्रमुख व्यवसायाच्या ठिकाणी केली होती.
जगभरातील मोठ्या कंपन्यांत नोकरकपातीच्या फेऱ्या सुरुच आहेत. याचा हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसत आहे. नुकतेच 'अॅमेझॉन'ने सुमारे १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून अमेझॉनने २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने ६ हजार नोकरकपातीची घोषणा केली होती.