Fidji Simo: खर्च रग्‍गड झाला, नफ्याचं काय? Open AI ने नफा वाढवण्यासाठी नियुक्त केलेली 39 वर्षांची तरुणी कोण?

Fidji Simo Journey Education Family Background: फ्रान्समधील लहानशा शहरात वाढलेल्या फिजी सिमो यांनी पॅरिसमधील बिझनेस स्कूल शिक्षण पूर्ण केले. यानंतर नोकरीच्या शोधात त्या कॅलिफोर्नियात पोहोचल्या.
Image Of Fidji Simo
Fidji SimoPudhari
Published on
Updated on

Who is Fidji Simo

सॅन फ्रान्सिस्को : फ्रान्समध्ये मासेमारी करणाऱ्या कुटुंबात जन्मलेली मुलगी लहानपणी तिच्या आजोबांची भलीमोठी बोट बघून उत्साहित व्हायची... बोटवर क्रू मेंबर म्हणून काम करत तिच्या आजोबांनी मोठ्या कष्टानं मोठी बोट विकत घेतली होती... बालपणी हीच बोट आणि आजोबांचा संघर्ष तिला प्रेरणा देणारा ठरलं. पुढे जाऊन हीच मुलगी पदवीधर झाली... कुटुंबातली पहिली पदवीधर म्हणून तिचं कौतुक वाटणं साहजिकच... पण तिची स्वप्न इथेच संपली नाहीत. एकदा एका महिला सहकाऱ्याशी गप्पा मारताना ती सहज म्हणाली की पुढे जाऊ मी कदाचित इन्स्टाग्रामची सीईओ होईन...ती सीईओ झाली पण इन्स्टाकार्टची आणि आता ओपन आयची. हा प्रवास आहे जिद्द, चिकाटी, सतत शिकण्याची तयारी आणि ध्येयवेड्या तरुणीचा. तीचं नाव आहे फिजी सिमो. OpenAI ने सिमो यांची ‘CEO ऑफ Applications’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

Image Of Fidji Simo
WhatsApp Payment : व्हॉटस्अ‍ॅप पेमेंट न झाल्यास रिफंड कसा मिळेल?

कोण आहेत फिजी सिमो?

बुधवारी OpenAI ने घोषणा केली की Instacart च्या CEO फिजी सिमो यांना टॉप मॅनेजमेंट टीममध्ये घेतलं आहे. फ्रान्समधील लहानशा शहरात वाढलेल्या फिजी सिमो यांनी पॅरिसमधील बिझनेस स्कूल शिक्षण पूर्ण केले. यानंतर नोकरीच्या शोधात त्या कॅलिफोर्नियात पोहोचल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला ईबेमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर त्या फेसबुकमध्ये गेल्या.

फेसबुकमध्ये त्यांनी मोबाईल अॅड प्लॅटफॉर्म, व्हिडिओ आणि एंटरटेनमेंट असे विविध प्रोडक्ट यशस्वीरित्या हाताळलीत. फेसबुकमध्ये 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलं. यानंतर त्यांची Instacart मध्ये CEO पदी नियुक्ती झाली. त्यांनी कंपनीला सलग पाच तिमाहींमध्ये नफा मिळवून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वशैलीबाबत बोलताना सहकर्मचारी सांगतात की, सिमो या बारकाईने निरीक्षण करणाऱ्या, निर्णयक्षम आणि नेमकं काम करणाऱ्या व्यवस्थापक आहेत. आता त्यांची OpenAI च्या ‘CEO ऑफ Applications’ म्हणून नियुक्ती झाली आहे. सिमो ही मोठी टीम उत्तमरित्या हाताळते. तर ऑल्टमन हे समस्यांवर उपाय शोधण्यात कुठेतरी कमी पडतात. चांगल्या संकल्पना डोक्यात येणं हा एक भाग आणि त्या प्रत्यक्षात त्या राबवणं हा दुसरा भाग. ऑल्टमन हे राबवण्यात कमी पडतात, असंही काही जणांचं म्हणणं आहे.

फिजी यांचे पती कोण आहेत?
फिजी यांची प्रेमकहाणीही प्रत्येकासाठी स्वप्नवत असावी अशीच आहे. फिजी या किशोरवयात असताना रेमी मिराईस यांना भेटल्या. पुढे जाऊन प्रेम झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांना एक लहान मुलगीही आहे. फिजी यांच्यासोबत फ्रान्स सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. फिजी यांच्या प्रत्येक निर्णयाला रेमी यांचा पाठिंबा असतो आणि यशस्वी करिअरमध्ये रेमीचं तितकंच योगदान आहे असं त्या प्रांजळपणे मान्य करतात.

मीटिंगमध्ये खुर्चीऐवजी रिक्लायनर

फेसबुकमध्ये नोकरीला लागल्यावर त्यांनी अमेरिकन इंग्लिशचा कोर्सही केला. फ्रेंचऐवजी अमेरिकन उच्चार असतील तर फायदा होईल असं त्यांना सांगण्यात आलं होतं. हा कोर्स केला, वेशभूषेवर काम केलं. फॉर्मल कपडे, हाय हिल्स यावर भर दिला. पण काही दिवसांमध्येच सिमो यांना लक्षात आले ‘ही मी नव्हेच.’ यापुढे स्वत:शी प्रामाणिक रहायचं, असा निर्धार त्यांनी केला.

सिमो यांना postural tachycardia syndrome (POTS) चे निदान झाले. आरोग्याच्या समस्यांमुळे गर्भपातही करावं लागलं. पण त्या थांबल्या नाहीत. जेव्हा वर्क फ्रोम होम ही संकल्पनाही अस्तित्वात नसावी तेव्हा त्यांनी काही काळ घरून काम केलं. उपचार सुरू असलेल्या बेडवरूनच त्यांनी मीटिंगही घेतल्या होत्या. इतकंच नव्हे POTS मध्ये एखादा व्यक्ती जास्त वेळ उभा राहिला तर त्याच्या ह्रदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, रक्तदाब वाढ, भोवळ अशा समस्यांचा सामना करावा लागतो. सिमो यांनी मीटिंग रुममध्ये त्यांच्यासाठी चक्क रिक्लायनर खुर्ची मागवून घेतली. मीटिंगदरम्यान रक्तदाब वाढू नये म्हणून त्यांनी ही शक्कल लढवली होती. पुढे जाऊन त्यांनी आरोग्यासाठी एका रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

Image Of Fidji Simo
कशी रोखाल ‘यूपीआय’ फसवणूक?

फिजी सिमो यांच्याकडे कोणती जबाबदारी?

OpenAI ने सिमो यांची ‘CEO ऑफ Applications’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या हाती कंपनीच्या उत्पादन, विक्री आणि आर्थिक व्यवस्थापनाची सूत्रं देण्यात आली आहेत. कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांना सिमो यांच्यासारख्या अनुभवी आणि यशस्वी सहकाऱ्याची गरज होती. कारण मागील काही महिन्यांपासून OpenAI वर खर्चाचा डोंगर वाढत आहे. आता कंपनीला नफ्यासाठी विशेष उपाययोजनांची गरजच आहे. ही मोठी जबाबदारी आता सिमो यांच्यावर सोपविण्यात आली आहे. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं की, सिमो या भूमिकेसाठी अत्यंत योग्य आहेत. "मार्च 2024 मध्ये त्या OpenAI च्या बोर्डमध्ये सामील झाल्यापासून त्यांनी आधीच कंपनीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. पुढील काही महिन्यांत Instacart मधील भूमिकेतून हळूहळू बाहेर पडून, या वर्षाच्या अखेरीस त्या OpenAI मध्ये जबाबदारी स्वीकारणार आहेत.

'काम करा, वेळ वाचवा' हा मूळ मंत्र...

ऑल्‍टमन आणि सिमो या दोघांनाही अनावश्यक मिटिंग्जविषयी प्रचंड चीड आहे. Instacart कंपनीमध्ये सिमो यांनी तब्बल १ लाख तासांच्या मिटिंग्ज रद्द करत कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला. OpenAI मध्येही दरवर्षी सर्व स्थायी मिटिंग्ज रद्द केल्या जातात. त्‍यामुळे आता काम करा, वेळ वाचवा हे कंपनीचा मूळ मंत्र असेल, असे मानले जात आहे.

OpenAI चं भविष्य उज्वल, पण वाट कठीण

2022 मध्ये ChatGPT लाँच झाले. यानंतर OpenAI ची टीम पाचपट झाली आहे. OpenAI हे ChatGPT मुळे लोकप्रिय असलं, तरी आर्थिक दृष्टिकोनातून अजून खूप पल्ला गाठायचा आहे. वेबसाइट ट्रॅफिक महिन्‍याला तब्‍बल 5.1 अब्जवर पोहचले आहे. तरीही तरीही, OpenAI अजूनही मोठ्या आर्थिक तोट्यात आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना स्‍पष्‍ट केले आहे की, 2029 पर्यंत नफा होणार नाही आणि त्याआधी 4-5 अब्ज डॉलर तोटा होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे आता सिमो यांच्यासमोर कंपनीच्‍या व्यावसायिक दृष्या यश मिळवून देण्‍याचे मोठे आव्‍हान असणार आहे. सॅम ऑल्टमन यांनी स्पष्ट केलं आहे की, OpenAI च्या अ‍ॅप्लिकेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसर्च – अशा तिन्ही विभागात भविष्यात ट्रिलियन डॉलर्सची मूल्य असणारी कंपनी होईल. पण सध्यातरी OpenAI ला नफा कमवण्यासाठी सिमो यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरणार आहे. येणार्‍या दिवसांमध्‍ये त्‍यांचे नेतृत्त्‍व स्‍पष्‍ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news