

US-Israel Attack Iran:
वॉशिंग्टन: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संघर्षाबाबत एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. "इराणविरुद्ध सुरू असलेली लष्करी कारवाई पुढील चार आठवड्यांत किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीत संपुष्टात येईल," असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. एका प्रतिष्ठित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या युद्धाच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन सैन्याची मोहीम ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा वेगाने सुरू आहे. "इराण हा एक मोठा देश आहे, तरीही ही प्रक्रिया चार आठवड्यांचीच असेल असा आमचा अंदाज आहे. आम्ही इराणचे संपूर्ण नेतृत्व आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात उद्ध्वस्त केले आहे. आतापर्यंतच्या कारवाईत त्यांचे ४८ लोक मारले गेले असून अजूनही अनेक लक्ष्यांवर प्रहार करणे बाकी आहे," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
या युद्धात प्राण गमावलेल्या तीन अमेरिकन सैनिकांचा उल्लेख करताना ट्रम्प भावूक झाले. त्यांनी या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच अमेरिकन जीवितहानी आहे. यापूर्वी वेनेझुएलाचे हुकूमशाह निकोलस मादुरो यांची अटक किंवा इराणच्या अणुकेंद्रांवरील बॉम्बफेक असो, त्यात एकाही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला नव्हता. ट्रम्प यांनी सांगितले की, ते लवकरच शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या या महायुद्धात आता सौदी अरेबियादेखील सामील होणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सौदीवरही हल्ले झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय बहरीन, कतार आणि जॉर्डन सारख्या मित्रराष्ट्रांच्या प्रमुखांशीही ट्रम्प यांनी चर्चा केली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या या एकत्रित हल्ल्यांनंतर इराणमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊ शकते, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
भविष्यात इराणसोबत चर्चेची दारे उघडी आहेत का? या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, "इराण आता चर्चेसाठी तयार आहे, पण मला वाटते की त्यांनी हा प्रयत्न गेल्या आठवड्यातच करायला हवा होता. सध्या मी आमच्या जनरल्ससोबत बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे."