

US Green Card marriage new rules 2025 USCIS update
वॉशिंग्टन : अमेरिकेने विवाहावर आधारित ग्रीन कार्ड अर्ज प्रक्रियेसाठी नव्या आणि अधिक कठोर मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. विवाहाच्या आधारे स्थायिक होण्याचा अर्ज करणाऱ्या जोडप्यांकडून आता खऱ्या संबंधाचे ठोस पुरावे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन 1 ऑगस्ट 2025 रोजी USCIS (US Citizenship and Immigration Services) ने आपल्या अधिकृत पॉलिसी मॅन्युअलमध्ये "फॅमिली बेस्ड इमिग्रंट्स" या विभागांतर्गत केले असून, ते तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, अर्जाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि काटेकोर पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
नवीन दस्तऐवजीकरणाची अट: जोडप्यांना एकत्र राहत असल्याचे पुरावे, जसे की संयुक्त बँक खाते, घरखर्चाचे कागदपत्रे, एकत्र फोटो, तसेच मित्र व नातेवाइकांचे साक्षांकित पत्र सादर करावे लागणार आहेत.
अनिवार्य मुलाखती: प्रत्येक जोडप्याला आता सखोल मुलाखतीस सामोरे जावे लागेल, ज्याद्वारे त्यांच्या नातेसंबंधांची खरीपणा तपासली जाईल.
पूर्वीच्या अर्जांची तपासणी: यापूर्वी एकाच अर्जदाराने अनेक वेळा sponsorship केले असल्यास, अधिक संशयास्पद मानून चौकशी करण्यात येणार आहे.
इमिग्रेशन इतिहासाची तपासणी: आधीपासूनच अमेरिकेत इतर व्हिसावर असलेल्या (जसे H-1B) व्यक्तीने जर विवाहावर आधारित स्थायिक होण्याचा अर्ज केला, तर त्याच्या संपूर्ण इमिग्रेशन इतिहासाची काटेकोरपणे तपासणी होणार आहे.
NTA (Notice to Appear): जर अर्ज स्वीकृत झाला असला, तरी अर्जदार कायदेशीरदृष्ट्या अमेरिकेत राहण्यास अपात्र असल्यास, त्याला निर्वासन प्रक्रियेसाठी बोलावले जाऊ शकते.
USCIS च्या म्हणण्यानुसार, “अयोग्य, बनावट किंवा अपात्र कुटुंब-आधारित ग्रीन कार्ड अर्जांमुळे लोकांचा या प्रक्रियेवरील विश्वास ढासळतो आणि अमेरिका म्हणून कुटुंब एकतेला बाधा निर्माण होते.”
हे नवे नियम भारतीय अर्जदारांसाठीही लागू आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकन नागरिकाने जर भारतीय जोडीदाराला spouse म्हणून ग्रीन कार्डसाठी sponsor केले, तर त्यांना आता खऱ्या नात्याचे अधिक ठोस पुरावे द्यावे लागतील. बनावट विवाह किंवा कागदपत्रांतील विसंगती आढळल्यास, चौकशीस सामोरे जावे लागेल आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते.
या नव्या धोरणाला एक पार्श्वभूमी आहे – मे महिन्यात आकाश प्रकाश मकवाना नावाच्या भारतीय नागरिकाने बनावट विवाहात सहभागी झाल्याची कबुली दिली. त्याने J-1 व्हिसा ओव्हरस्टे केले आणि बनावट सहवासाचे पुरावे तसेच खोट्या कौटुंबिक अत्याचाराचे आरोप करून ग्रीन कार्ड मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
USCIS ने स्पष्ट केले आहे की, “ही नविन मार्गदर्शक तत्त्वे खरेखुरे विवाह व नातेसंबंध ओळखण्यासाठी आमची क्षमता वाढवतील आणि अमेरिकन कायद्याशी सुसंगत राहण्यास मदत करतील.”