

Ukraine adult content tax drone funding : रशियाविरुद्धच्या युद्धात देशाला आर्थिक बळ देण्यासाठी सरकार अतिरिक्त महसूल मिळवण्याचे मार्ग शोधत असताना, युक्रेन आता अॅडल्ट एंटरटेनमेंट (अश्लील सामग्री) उद्योगाला कायदेशीर मान्यता देण्याचा आणि त्यावर कर आकारण्याचा विचार करत आहे.त्यातून मिळणार्या कराच्या माध्यमातून लष्करासाठी ड्रोन खरेदी करण्याचा युक्रेन सरकारचा प्रयत्न आहे, असे वृत्त 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिले आहे.
युक्रेनमध्ये सध्या अश्लील साहित्य बनवणे, बाळगणे किंवा त्याचे वितरण करणे बेकायदेशीर असून त्यासाठी सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. असे असूनही, देशात हा उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेकदा कायदेपालक यंत्रणांकडून या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत. अधिकारी या कंटेंट क्रिएटर्सकडून कर मागतात, परंतु कमाई जाहीर करणाऱ्यांवर उलट अश्लीलतेच्या कायद्यांतर्गत कारवाईचा धोका निर्माण होतो.
युक्रेनच्या संसदेच्या वित्त समितीचे अध्यक्ष आणि खासदार यारोस्लाव झेलेझनियाक यांनी अश्लील चित्रफीत उद्योगाला कायदेशीर मान्यता देणारा विधेयक मांडला आहे. या निर्णयामुळे वार्षिक सुमारे २५ दशलक्ष डॉलरचा (सुमारे २०८ कोटी रुपये) महसूल गोळा होऊ शकतो, ज्यामुळे युद्धासाठी तब्बल ३०,००० ड्रोन खरेदी करणे शक्य होईल, असा अंदाज झेलेझनियाक यांनी व्यक्त केला आहे.
'अडल्ट कंटेंट'मध्ये सहभागी असणार्या महिला कर भरत नाहीत आणि गुन्हेगारी कारवाईला सामोऱ्या जातात, किंवा कर भरतात आणि अश्लीलता कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरतात. ही अत्यंत विचित्र परिस्थिती आहे," असे झेलेझनियाक यांनी नमूद केले. या निर्णयामुळे करसंकलन वाढेल, भ्रष्टाचार कमी होईल आणि युद्धाच्या काळात पोलिसांवरील ताण कमी होईल, असा समर्थकांचा दावा आहे.
'ऑन्लीफॅन्स'ची पालक कंपनी असलेल्या 'फेनिक्स इंटरनॅशनल'च्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये सुमारे ७,९०० युक्रेनियन नागरिकांनी या प्लॅटफॉर्मवरून १३१ दशलक्ष डॉलरहून अधिक कमाई केली. परंतु, कर अधिकाऱ्यांकडे उत्पन्नाची माहिती देणाऱ्या क्रिएटर्सवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. स्वेतलाना द्वॉर्निकोव्हा या क्रिएटरने सांगितले की, पोलिसांनी तिच्या घरातून २०,००० डॉलर रोकड, लॅपटॉप आणि हार्ड ड्राईव्ह जप्त केल्या. यामुळे अनेक युक्रेनियन क्रिएटर्सनी युरोपातील इतर देशांमध्ये स्थलांतर केले आहे.
क्रिएटर स्वेतलाना द्वॉर्निकोव्हा हिने युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेंस्की यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक याचिका दाखल केली. आपण करदाते असून गुन्हेगारांसारखी वागणूक मिळू नये, अशी मागणी तिने केली. आपण सुमारे ९,०००,००० डॉलरचा कर भरला असून ही रक्कम युद्धातील सैनिकांच्या मदतीसाठी मोलाची आहे, असा दावा तिने केला.या याचिकेला एका आठवड्यात २५ हजारहून अधिक नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रपती झेलेंस्की यांनी यावर संसदेत विचार केला जाईल असे स्पष्ट केले. जुलै महिन्यात या विधेयकाने पहिल्या टप्प्यातील मंजुरी मिळवली असून लवकरच दुसऱ्या वाचनासाठी ते संसदेत मांडले जाणार आहे.
रशियासोबतच्या दीर्घकालीन युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. संरक्षण, लष्करी साहित्य आणि युद्धकाळातील गरजांसाठी राजधानी कीव्हला अतिरिक्त निधीची प्रचंड गरज आहे. युक्रेन सध्या स्वदेशी ड्रोन, लांब पल्ल्याचे स्ट्राईक ड्रोन आणि सागरी ड्रोनच्या निर्मितीवर भर देत आहे. परदेशी मदतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी युक्रेनला अशा नाविन्यपूर्ण करसंकलनाच्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.