

Russia drone attack Kyiv : कीव्हच्या पश्चिम उपनगराजवळील एका गोदामावर रशियन ड्रोनने रात्रीच्या वेळी केलेल्या हल्ल्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला आहे. गोदामामध्ये 'स्फोटक वस्तू' साठवून ठेवल्याचा संशय असून, युक्रेनच्या सरकारी वकिलांनी याप्रकरणी गुन्हेगारी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चौकशी सुरू केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांवर लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. 'एएफपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी कीव्हच्या पश्चिम उपनगरांवरून आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. गोदामाला लागलेली आग अद्यापही धुमसत आहे. युक्रेनच्या सरकारी वकील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, "२८ ऑगस्ट रोजी रात्री ८:१० च्या सुमारास कीव्हच्या पश्चिम वेशीवर वसलेल्या मायला शहरातील एका कंपनीच्या आवारात एक मानवरहित हवाई वाहन (ड्रोन) कोसळले किंवा धडकले. त्यानंतर कंपनीच्या आवारात भीषण आग लागली आणि स्फोट होऊ लागले."
"रशियाने केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये दिमित्रिवस्काचे महापौर तारास डिडिच (Taras Didych) यांचाही समावेश आहे," अशी माहिती कीव्ह प्रदेशाचे गव्हर्नर तिमूर तकाचेन्को यांनी दिली.
पंतप्रधान सर्गी कोरेत्स्की यांनी या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला. जुलै महिन्यात कीव्हजवळील विश्नेवे येथील दारूगोळा आगारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आपण कोणताही "धडा" शिकलो नसल्याचे ते म्हणाले. जुलै महिन्यातील त्या चौकशीतून एका सरकारी कंपनीच्या गंभीर त्रुटी उघड झाल्या होत्या. निवासी इमारती जवळ असूनही या कंपनीने सुरक्षा मानकांचे पालन केले नव्हते. "दोन्ही देशांमधील संघर्ष आता पाचव्या वर्षातही सुरू आहे. त्याच चुका पुन्हा पुन्हा करणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे," असे कोरेत्स्की यांनी टेलिग्रामवर म्हटले आहे.