

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. २४ जून) पहाटे ३:३० वाजता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा दावा केला. मात्र हा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी फेटाळला आहे. इस्रायलसोबत युद्धबंदीच्या वृत्ताला त्यांनी नकार दिला आहे. इस्रायलसोबत अद्याप कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही. इस्रायलने आमच्यावर बेकायदेशीर हल्ले थांबवले तर इराण प्रत्युत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पहाटे ३:३० वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इस्रायल आणि इराणमध्ये १२ तासांत म्हणजेच आतापासून ६ तासांत पूर्ण युद्धबंदी लागू होईल. इराण पहिल्या १२ तासांसाठी शस्त्रे ठेवेल आणि त्यानंतर पुढील १२ तासांसाठी इस्रायल शस्त्रे ठेवेल. दरम्यान, न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यानेही युद्धबंदीबाबत ट्रम्पच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
ट्रम्प यांच्या घोषणेच्या काही तास आधी, इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद हवाई लष्करी तळावर १९ क्षेपणास्त्रे डागली. तथापि, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण इराणने हल्ल्यापूर्वीच याबद्दल अलर्ट जारी केला होता.
इराकच्या अल सुमारिया टीव्ही नेटवर्कनुसार, इमाम अली हवाईतळावरील रडार सिस्टमला लक्ष्य करण्यात आले आहे. तथापि, हा हल्ला कोणी केला याची माहिती दिलेली नाही. हा हवाईतळ इराकच्या धी कार प्रांतात आहे. इमाम अली बेस हा इराकच्या हवाई दलाचा एक महत्त्वाचा लष्करी तळ मानला जातो. सध्या हल्ल्यात किती नुकसान झाले आहे किंवा काही जीवितहानी झाली आहे की नाही हे स्पष्ट नाही.
इराणच्या परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, - इस्रायलला शिक्षा देण्यासाठी इराणची लष्करी कारवाई शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजेच पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहिली. आमच्या सैनिकांनी शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. ते त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाचे रक्षण करण्यास तयार आहेत. तसेच त्यांनी इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप कोणताही औपचारिक युद्धबंदी करार झालेला नाही, असेही स्पष्ट केले.
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की आतापर्यंत जनतेसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. , न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यानेही युद्धबंदीबाबत ट्रम्पच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. दरम्यान, इस्त्रायलच्या लष्कराने स्पष्ट केले आहे की, देशात आधीच लागू असलेले नियम तेच राहतील. याचा अर्थ असा की लोकांना अजूनही एकाच ठिकाणी एकत्र येण्याची परवानगी नाही, शाळा आणि कार्यालये बंद राहतील आणि प्रत्येकाने सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सरकार किंवा सैन्याकडून कोणतेही नवीन निर्देश येईपर्यंत जनतेला सतर्क राहण्यास आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.