

तेहरान/तेल अवीव : दोन दशकांहून अधिक काळ इस्रायल आणि इराण हे सावलीयुद्धात अडकले होते. गुप्त हल्ले, सायबर हेरगिरी, आणि परस्पर धमक्या यावरच त्यांच्या संघर्षाची सीमा होती. मात्र, 2025 च्या वसंत ऋतूमध्ये अनेक राजकीय, लष्करी व प्रादेशिक कारणांनी एकत्र स्फोटक वळण घेतलं आणि ही संतुलनाची दोरी तुटली. गाझामधील हमासच्या भीषण हल्ल्याला उत्तर देताना इस्रायलने मोठी लष्करी कारवाई केली. यामुळे इराणने आपल्या प्रतिरोध आघाडीला हिजबुल्ला, हूथी, सीरिया-इराकमध्ये अधिक सक्रिय केले. इराणकडून या प्रॉक्सी गटांना मदत वाढली आणि यामुळे इस्रायलने सीमांच्या पलीकडे अधिक आक्रमक कृती सुरू केल्या.
इराणच्या मुख्य युरेनियम समृद्धी केंद्रात मोठा स्फोट झाला. इराणने यासाठी इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादला जबाबदार धरले; पण इस्रायलने मौन बाळगले. ही घटना इराणच्या नेतृत्वासाठी लाजिरवाणी ठरली आणि त्यांनी थेट सूड घेण्याची भूमिका घेतली.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात कुड्स फोर्सचे सीरिया-लेबनॉन प्रमुख ब्रिगेडियर जनरल रेजा जाहेदी ठार झाले. यानंतर अयातुल्ला अली खामेनी यांनी स्ट्रॅटेजिक संयमाचा काळ संपला, अशी घोषणा केली आणि इराणने पहिल्यांदाच थेट आपल्या भूमीवरून इस्रायलवर हल्ले सुरू केले.
इराणकडून तब्बल 350 हून अधिक ड्रोन, क्रूझ व बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलकडे डागण्यात आली. बहुतेक क्षेपणास्त्रे अमेरिकन, इस्रायली, ब्रिटिश आणि फ्रेंच संरक्षण यंत्रणांनी अडवली; पण हा थेट हल्ला इस्रायलच्या ‘रेड लाईन’च्या पलीकडे गेला आणि त्यामुळे इस्रायलने उघड युद्ध जाहीर केले.
वॉशिंग्टनने इस्रायलला संपूर्ण पाठिंबा दिला आणि इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या ठिकाणांवर हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली. रशिया व चीनने राजनैतिक आणि (अहवालानुसार) लष्करी हालचाली सुरू केल्या.
हिजबुल्लाकडून इस्रायलच्या उत्तरेकडे 2006 नंतरचे सर्वात तीव्र रॉकेट हल्ले झाले.
इराण समर्थित सीरियन मिलिशियांनी गोलान हाइट्सवर ड्रोन हल्ले केले.
हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात इस्रायलशी संबंधित जहाजांवर टार्गेट केल्यावर इस्रायलने सना जवळ हवाई हल्ले सुरू केले.
अणू महत्त्वाकांक्षा व अस्तित्वमय इस्रायलसाठी अण्वस्त्रधारी इराण ही अस्तित्वासाठी धोकादायक गोष्ट आहे; तर इराणसाठी त्याचा अणुकार्यक्रम हा पाश्चात्त्य आक्रमणांपासून बचावाचा उपाय आहे.
इस्रायल आणि इराण दोघेही मध्यपूर्वेत वर्चस्व मिळवू इच्छितात-इस्रायल अमेरिकासह सुन्नी देशांबरोबर, तर इराण शिया नेतृत्वाखालील प्रतिरोध आघाडीद्वारे.
1979 च्या इराणी क्रांतीपासून, इस्रायलला इराणकडून अवैध झायनिस्ट राष्ट्र म्हटले जाते. इस्रायली नेते इराणच्या या भूमिकेचा उपयोग देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय समर्थनासाठी करतात.
व्हिएन्ना आणि बीजिंगमध्ये युद्धबंदीचे प्रयत्न सुरू आहेत; पण सध्या कोणत्याही पक्षाला माघार घेण्यात हित वाटत नाही.
तेलबाजार सतर्क झाले आहेत; होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
अमेरिकेचा आणि इराणचा थेट संघर्ष, किंवा रशियाची इराणला उघड मदत झाली, तर हे युद्ध प्रादेशिक न राहता जागतिक स्वरूप घेऊ शकते.