Superhabitable Worlds : सूर्यमालेत जीवसृष्टी टिकवून ठेवण्यास सक्षम असलेला पृथ्वी हाच एकमेव ग्रह आहे, असे आजवर आपण मानत आला आहोत. मात्र, हे पूर्ण सत्य नाही, असे नवीन संशोधनातून असे समोर आले आहे. मानवासाठी आणि इतर जीवसृष्टीसाठी पृथ्वीपेक्षाही अधिक उत्तम आणि अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे, असे 'सुपर-हॅबिटेबल वर्ल्ड्स' (अत्यंत अनुकूल वस्तीयोग्य ग्रह) काही ग्रह असू शकतात, अशी शक्यता खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी वर्तवली आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, संशोधक एका रंजक गोष्टीचा शोध घेत आहेत. त्यांच्या मते, "पृथ्वीपेक्षा थोडेसे मोठे आणि विशिष्ट ताऱ्यांभोवती फिरणारे काही ग्रह, जीवसृष्टीसाठी आपल्या पृथ्वीपेक्षाही जास्त उत्तम असू शकतात! येथील वातावरण जीवसृष्टीला पृथ्वीपेक्षा अब्जावधी वर्षे अधिक काळ टिकून राहण्यास आणि उत्क्रांत होण्यास मदत करू शकते."
वैज्ञानिक संशोधनानुसार, 'सुपरहैबिटेबल' ग्रह म्हणजे अशी ठिकाणे, जिथे जीवसृष्टीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी पृथ्वीपेक्षाही अधिक अनुकूल आणि स्थिर वातावरण मिळू शकते. विशेष म्हणजे, हे ग्रह पृथ्वीच्या आकारापेक्षा सुमारे २० ते ३० टक्के मोठे आणि वस्तुमानाच्या (Mass) बाबतीत जवळपास दुप्पट असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, वस्तुमान जास्त असल्यामुळे या ग्रहांवर गुरुत्वाकर्षणही मजबूत असेल. परिणामी, ते स्वतःभोवती एक दाट वायुमंडल टिकवून ठेवू शकतील. तेथील हवामान अधिक समशीतोष्ण आणि स्थिर राहील. याशिवाय, या ग्रहांचे मोठे लोहयुक्त गाभा एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल, अंतराळातील धोकादायक रेडिएशनपासून या ग्रहांचे प्रभावी रक्षण करेल.
पृथ्वीवरील उष्णकटिबंधीय बेटे आणि पाणी हे समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जातात. याच धर्तीवर, 'सुपर-हैबिटेबल' ग्रहांवर मोठ्या क्षेत्रावर पसरलेले उथले समुद्र आणि विस्तीर्ण सरोवर असू शकतात. तेथील परिसंस्थेला आणि जीवसृष्टीच्या वाढीला मोठी चालना देऊ शकतात, अशी शक्यताही संशोधनांनी व्यक्त केले आहे.
या संपूर्ण संशोधनातील सर्वात रंजक पैलू म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या ताऱ्याभोवतीचे वास्तव्य, ज्यांना 'के-ड्वार्फ' म्हटले जाते. हे तारे आपल्या सूर्याच्या तुलनेत आकाराने लहान, तुलनेने थंड आणि अधिक केशरी रंगाचे असतात.विशेष बाब म्हणजे, हे तारे आपला ऊर्जासाठा अत्यंत संथपणे खर्च करतात. तसेच ते अरबों-खरबों वर्षे अविरत तेवत राहू शकतात. याउलट, आपला सूर्य भविष्यात वृद्ध झाल्यावर अधिक प्रखर आणि उष्ण होईल, यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचा धोका आहे.
बर्लिनमधील वैज्ञानिक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्रयोगातून समोर आले आहे की, के-ड्वार्फ ताऱ्यांसारख्या केशरी प्रकाशात वनस्पती कृत्रिम प्रकाशाच्या तुलनेत अधिक वेगाने आणि जोमाने वाढतात. यावरून स्पष्ट होते की, अशा ताऱ्यांच्या कक्षेत फिरणाऱ्या ग्रहांवर प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया अतिशय प्रभावीपणे पार पडू शकते.
२०१० च्या दशकात खगोलतज्ज्ञ रेन हेले आणि जॉन आर्मस्ट्रांग यांनी एक विचार मांडला होता की, जीवनासाठी पृथ्वी एकमेव आदर्श मॉडेल असेलच असे नाही. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा हा प्रवास अत्यंत नाजूक समतोलावर टिकून आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी सूर्याच्या किंचितशी जवळ असती, तर आपले समुद्र कदाचित कधीच अस्तित्वात आले नसते. त्यातच, आपला सूर्य काळानुरूप सतत उष्ण आणि चकाकणारा होत चालला आहे. या अंदाजानुसार, आगामी सुमारे ५० कोटी वर्षांत पृथ्वी इतकी तापू शकते की येथे प्रगत जीवसृष्टीचे अस्तित्व टिकवणे कठीण होईल.याउलट, के-ड्वार्फ ताऱ्यांची परिक्रमा करणारे ग्रह पृथ्वीपेक्षा कैक पटीने अधिक काळ जीवसृष्टीसाठी अनुकूल राहू शकतात, ज्यामुळे तेथील जीवांना विकसित होण्यासाठी आणि गुंतागुंतीचे रूप धारण करण्यासाठी अथांग वेळ मिळेल.
वैज्ञानिक विश्वास व्यक्त करतात की, अशा स्वरूपाचे ग्रह खरोखरच अस्तित्वात असल्यास तिथे वनस्पती आणि प्राण्यांसारख्या समृद्ध परिसंस्था नक्कीच असेल. तथापि, सौरमंडळाच्या बाह्य भागात खरोखरच जीवसृष्टी अस्तित्वात आहे किंवा नाही, याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत.केवळ अनुकूल परिस्थिती असली म्हणजे तिथे जीवसृष्टी स्वतःहून निर्माण होईलच, असे नाही. त्यामुळेच योग्य तापमान, प्रवाही पाणी आणि वायुमंडळात जैविक हालचालींचे संकेत देणाऱ्या अशाच विशिष्ट ग्रहांचा शोध सध्या घेतला जात आहे.
या 'सुपरहैबिटेबल' जगाचा शोध घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ आता अत्याधुनिक स्पेस टेलिस्कोप्सच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये युरियन स्पेस एजन्सीचे (ESA) आगामी 'प्लेटो' (PLATO) मिशन २०२७ मध्ये प्रक्षेपित केले जाणार असून, ते के-ड्वार्फ ताऱ्यांमागील मोठे खडकयुक्त ग्रह शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणि चिली येथे उभारले जात असलेले 'एक्सट्रीमली लार्जेस्ट टेलिस्कोप' (ELT) या ग्रहांच्या वायुमंडळाचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या रासायनिक आणि जैविक रहस्यांचा उलगडा करतील. या मालिकेत नासाचे नियोजित 'हॅबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्वेटरी' हे अभियान २०४० च्या दशकापर्यंत या संशोधनाला आणखी पुढे नेणार आहे.