

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टसाठी शुक्रवार १९ जुलै हा दिवस चांगलाच आव्हानात्मक होता. गुरूवार १८ जुलैच्या रात्री, क्राउड स्ट्राइक, मायक्रोसॉफ्टशी संबंधित सायबर सुरक्षा फर्मने आपली सिस्टम अपडेट केली, त्यानंतर मायक्रोसॉफ्टशी संबंधित सर्व सेवांमध्ये समस्या दिसू लागल्या. यानंतर मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील त्रुटींबाबत कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या आऊटेज समस्यांबाबत सीईओ सत्या नडेला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील समस्येचे कारण सांगितले आहे.
Microsoft CEO म्हणाले, "काल, CrowdStrike ने एक अपडेट जारी केले. ज्याने जागतिक स्तरावर IT प्रणालींवर परिणाम करण्यास सुरुवात केली. आम्हाला समस्येची जाणीव आहे आणि वापरकर्त्यांना त्यांची प्रणाली सुरक्षितपणे ऑनलाइन परत मिळवण्यात आम्ही CrowdStrike ला तांत्रिक मदत करत आहोत. "
क्राउड स्ट्राइक अपडेटमुळे अशा प्रकारची समस्या येत असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. या बगमुळे लोकांच्या पर्सनल कॉम्प्युटरसोबतच जगभरातील कंपन्या, बँका, सरकारी कार्यालये आणि विमान कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक ही समस्या सतत शेअर करत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात, असे देखील सत्या नडेला यांनी स्पष्ट केले आहे.