

Crude Oil Supply : लाल समुद्राकडे जाणाऱ्या सौदीच्या एका महत्त्वाच्या पाइपलाइनवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना पुढच्या महिन्यात कच्चे तेल मिळणार नाही, असे सौदी अरामकोने दोन युरोपीय रिफायनिंग ग्राहकांना कळवले आहे, असे वृत्त 'ब्लूमबर्ग न्यूज'ने दिले आहे. हा निर्णय सर्व युरोपीय खरेदीदारांना लागू होतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सौदी अरेबियाच्या १,२०० किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन'वर गेल्या आठवड्यात ड्रोन हल्ला झाला. उपग्रह प्रतिमा व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात तीन पंपिंग स्टेशन्सचे नुकसान झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही पाइपलाइन बंद करण्यात आली आहे; दरम्यान, या हल्ल्यासाठी सौदी अरेबियाने इराकमधील इराण-समर्थित मिलिशिया संघटनांवर आरोप केला आहे.
पाइपलाइन बंद झाल्यामुळे अरामकोच्या काही ग्राहकांमध्ये पर्यायी पुरवठा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. पर्यायी कच्चे तेल मिळवण्याच्या प्रयत्नात पोलंडच्या ऑर्लेन एसएने शुक्रवारपासून १० हून अधिक निविदा काढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मासिक तेल बाजार अहवालानुसार, ओईसीडीमधील युरोपीय देशांनी जूनमध्ये सौदी अरेबियाकडून दररोज ५,७७,००० बॅरल कच्चे तेल आयात केले. गेल्या सहा महिन्यांपासून, युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी मोठ्या प्रमाणात बंद असल्याने, ही पाइपलाइन मध्य-पूर्वेकडील तेलाच्या जागतिक वाहतुकीसाठी मुख्य पर्यायी मार्ग म्हणून काम करत आहे. या पाइपलाइनमधून दररोज ४० ते ५० लाख बॅरल कच्चे तेल वाहून नेले जात आहे, जे जागतिक पुरवठ्याच्या सुमारे ४% ते ५% इतके आहे.