Crude Oil Prices Drop: दिलासादायक! पाईपलाईन हल्ल्यानंतर सौदीने शोधला 'पर्यायी मार्ग'; जागतिक तेलाच्या किमतीत घट

मध्य पूर्वेतील पुरवठा विस्कळीत होण्याबाबतची चिंता काहीशी कमी
Crude Oil Prices Drop
Crude Oil Prices DropPudhari
Published on
Updated on
Summary

अमेरिकेच्या 'एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशन'च्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा ६ लाख ४० हजार बॅरलने कमी झाला असून, तो आता ४२.३४ कोटी बॅरलवर आला आहे.

Crude Oil Prices Drop : सौदी अरेबियाने ओमानमार्गे अतिरिक्त कच्च्या तेलाची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम थेट सलग दुसऱ्या दिवशीही तेलाच्या किमतीवर दिसून आला. आज (दि. १७ सप्टेंबर) कच्च्या तेलाच्या किमती १.२% नी घसरून १०४.५९ डॉलर्स प्रति बॅरलवर आल्या आहेत.

जागतिक तेलाच्या किमतीत घट होण्याचे मुख्य कारण काय?

सौदी अरेबिया ओमानमार्गे अतिरिक्त कच्च्या तेलाची वाहतूक करण्याची व्यवस्था करत असल्याच्या वृत्तामुळे मध्य पूर्वेतील पुरवठा विस्कळीत होण्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली, अशी माहिती निसान सिक्युरिटीजची उपकंपनी असलेल्या 'निसान सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट'चे मुख्य रणनीतीकार हिरोयुकी किकुकावा यांनी वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ला दिली. तसेच पुढील आठवड्यात अमेरिका-चीन शिखर परिषदेपूर्वी मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या दिशेने प्रगती होण्याचे संकेत मिळत असल्याचा परिणामही कच्च्या तेलाच्या दरांवर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सौदी अरेबियाकडून आशियाई रिफायनरीजना अतिरिक्त तेलाचा पुरवठा

'ईस्ट-वेस्ट' पाईपलाईनवरील हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाकडून होणारी कच्च्या तेलाची निर्यात विस्कळीत झाली होती; ही पाईपलाईन लाल समुद्रातील यानबू बंदरापर्यंत कच्च्या तेलाची वाहतूक करते आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ला (होर्मुझची सामुद्रधुनी) एक पर्याय उपलब्ध करून देते. आता सौदी अरेबिया ओमानच्या सोहार बंदराजवळ 'शिप-टू-शिप' आशियाई रिफायनरीजना अतिरिक्त कच्च्या तेलाचा पुरवठा करत आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मागील काही काळ सौदीच्या निर्यातीमध्ये आलेली तूट काही प्रमाणात भरून निघणार आहे.

Crude Oil Prices Drop
MECCA DRONE THREAT: युद्ध चिघळले! इस्लाम धर्मियांचे पवित्र स्थळ मक्कावर हल्ल्याचा प्रयत्न उधळला; सौदीने पाडला ड्रोन

'ईस्ट-वेस्ट' पाईपलाईन पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू

बाजार अहवालांमधील माहितीनुसार, सौदी अरेबिया आता काही दिवसांत त्याची काही क्षमता पूर्ववत करण्यासाठी आणि सुमारे सहा आठवड्यांत पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी काम करत आहे. मात्र निर्यात मार्गांवर दबाव वाढला आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेच्या लष्करी मदतीने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून अधिक कच्च्या तेलाची वाहतूक करण्याचे प्रयत्नही वाढवले आहेत.

Crude Oil Prices Drop
Crude Oil Prices | तेलाचा भडका; रुपयाची कसोटी!

'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'चे महत्त्व अधिकच वाढले

'ईस्ट-वेस्ट' पाईपलाईनवरील हल्ल्यांमुळे जागतिक तेल बाजारासाठी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'चे महत्त्व अधिकच वाढले आहे. या संघर्षापूर्वी, जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक-पंचमांश पुरवठा या जलमार्गावरून होत असे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी स्पष्ट केले आहे की, या आठवड्याच्या सुरुवातीला होर्मुझमधून १.८ कोटी (१८ दशलक्ष) बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक झाली आहे.

तेलाच्या किमती पोहोचल्या होत्या चार महिन्यांच्या उच्चांकावर

यानबू येथे कच्च्या तेलाची लोडिंग प्रक्रिया थांबवली गेली. युरोपियन ग्राहकांसाठीचा सौदीकडून होणारा पुरवठाही विस्कळीत झाला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला तेलाच्या किमती सुमारे चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या होत्या. स्टँडर्ड चार्टर्डच्या विश्लेषकांच्या मते, "पूर्व-पश्चिम पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे होर्मुझला असलेला एक महत्त्वाचा पर्याय कमकुवत झाला आहे आणि सौदी निर्यातीसंदर्भातील धोका वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापार आणि पर्यायी मार्ग या दोन्हीवर संकट असल्याने तेलाचे दर किंवा व्यवसायातील धोक्याचा खर्च वाढलेलाच राहणार आहे."

Crude Oil Prices Drop
Crude oil prices | कच्च्या तेलाचा पुन्‍हा भडका! ११५ च्या पार गेलेले दर आणखी किती वाढणार ?

मध्य-पूर्वेतील तणावामुळे तेलाचे भाव अस्थिर

अमेरिकेच्या 'एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशन'च्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा ६ लाख ४० हजार बॅरलने कमी झाला असून, तो आता ४२.३४ कोटी बॅरलवर आला आहे. तेल अभ्यासकांनी यापूर्वी अंदाज व्यक्त केला होता की, तेलाचा साठा तब्बल १६.२ लाख बॅरलने घटेल; परंतु प्रत्यक्ष झालेली घट त्यामानाने खूपच कमी आहे. विशेष म्हणजे, 'अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट'ने तेलाचा साठा ७१ लाख बॅरलने वाढेल असा अंदाज दिला होता, पण प्रत्यक्षात साठा कमीच झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी तेलाच्या किमतीत काही प्रमाणात घसरण झाली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अद्याप चिंतेत आहे. मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, तेलाच्या विहिरी व प्रकल्पांवरील हल्ल्यांची भीती आणि सागरी वाहतुकीतील अडथळे आदी कारणांमुळे जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news