

Sanskrit in Pakistan
लाहोर : भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानच्या शैक्षणिक क्षेत्रात जे कधी घडले नव्हते, ते या आठवड्यात लाहोरमध्ये घडले आहे. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेने ऐतिहासिक पाऊल उचलत संस्कृत भाषेचे शिक्षण सुरू केले आहे. यामुळे या विद्यापीठाच्या वर्गांमध्ये प्रथमच महाभारत आणि भगवद्गीता मधील श्लोकांसह संस्कृत श्लोक ऐकायला मिळाले.
विद्यार्थ्यांना केवळ संस्कृत भाषाच नाही, तर 'महाभारत' या टीव्ही मालिकेचे लोकप्रिय शीर्षक गीत "है कथा संग्राम की" चे उर्दू भाषांतरही शिकवले जात आहे. पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तीन महिन्यांच्या कार्यशाळेतून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. आता त्याचे रूपांतर एका पूर्ण विद्यापीठ अभ्यासक्रमात झाले आहे. २०२७ पर्यंत हा अभ्यासक्रम वर्षभराचा करण्याचा संस्थेचा मानस आहे.
संस्कृत पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न केलेले प्राध्यापक शाहिद रशीद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दक्षिण आशियाई प्रदेशाचे तत्त्वज्ञान, साहित्य आणि अध्यात्मिक परंपरांना आकार देणाऱ्या या भाषेचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी हे छोटे पण महत्त्वाचे पाऊल आहे. आपण ती का शिकू नये? ही अशी भाषा आहे जी या संपूर्ण प्रदेशाला जोडते. पाणिनीचे गाव इथेच होते. सिंधू संस्कृतीच्या काळात इथे खूप काही लिहिले गेले. आपण ते स्वीकारले पाहिजे. ते आपलेही आहे; ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही."
संस्कृत व्याकरणकार पाणिनी गांधारमध्ये राहत होते, जो सध्याचा खैबर पख्तूनख्वा प्रांत आहे. रशीद म्हणाले की, सुरुवातीला विद्यार्थ्यांना संस्कृत भीतीदायक वाटली, पण लवकरच त्यांना ती आवडायला लागली. शिकवण्याच्या पहिल्या आठवड्यातील एक घटना सांगताना ते म्हणाले, "जेव्हा मी सुभाषितां (शहाणपणाचे श्लोक) शिकवत होतो, तेव्हा उर्दू भाषेवर संस्कृतचा किती खोल प्रभाव आहे हे जाणून विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. काहींना तर संस्कृत हिंदीपेक्षा वेगळी आहे हे देखील माहीत नव्हते. जेव्हा विद्यार्थ्यांना तिची तार्किक रचना समजली, तेव्हा त्यांना या भाषेचा आनंद वाटू लागला."
विद्यापीठातील गुरमानी सेंटरचे संचालक डॉ. अली उस्मान कासमी यांनी सांगितले की, पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत दस्तऐवजांचा विस्तृत संग्रह आहे, पण दशकांपासून ते शैक्षणिक दृष्ट्या अस्पर्शित राहिले आहेत. आता गोष्टी बदलणार आहेत आणि विद्यापीठाने स्थानिक विद्वानांना संस्कृतमध्ये प्रशिक्षित करण्याची योजना आखली आहे. येत्या काही महिन्यांत या उपक्रमाला गती मिळेल. येणाऱ्या १०-१५ वर्षांत, पाकिस्तानमधून गीतेचे आणि महाभारताचे विद्वान उदयास येताना आपल्याला दिसू शकतात."