

तेहरान; वृत्तसंस्था : इराणची राजधानी तेहरानमधील 100 वर्षे जुन्या वैद्यकीय संशोधन केंद्रावर हल्ला झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, पाश्चर इन्स्टिट्यूट ऑफ इराणला लक्ष्य करण्यात आले असून, यामुळे इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणने हा नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमनपोर यांनी याला जागतिक आरोग्य व्यवस्थेवरील थेट हल्ला असे म्हटले आहे. ही संस्था 1920 मध्ये स्थापन झाली होती. देशाच्या वैद्यकीय संशोधन तसेच औषध निर्मितीमध्ये तिची मोठी भूमिका आहे, असे ते म्हणाले. हल्ल्यानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये इमारतीचे अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले दिसत आहेत. इराणने या घटनेचा तीव्र निषेध केला असून याला नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ला म्हटले आहे.
दरम्यान, इराणचे माजी परराष्ट्र मंत्री कमाल खराजी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून, यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर ते स्वतः गंभीर जखमी झाले आहेत. खराजी सध्या इराणच्या स्ट्रॅटेजिक फॉरेन रिलेशन्स कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. ही संस्था थेट देशाच्या सर्वोच्च नेत्याला सल्ला देते आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित मोठ्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. खराजी यांच्या तेहरानमधील घरावर हवाई हल्ला (एअर स्ट्राईक) करण्यात आला.
बैरूत : लेबनॉनकडून उत्तर इस्रायलवर एका तासाच्या आत दोन वेळा मोठे रॉकेट हल्ले करण्यात आलेे. गॅलीली प्रांतात रॉकेट पडल्यानंतर एका निवासी भागाजवळ धुराचे लोट उठताना दिसले. या हल्ल्यादरम्यान अवघ्या काही मिनिटांत 30 हून अधिक रॉकेट डागण्यात आले. त्यामुळे परिसरात मोठी घबराट आणि धावपळ उडाली.