

Pakistan Air Force Chief Zaheer Ahmed Baber Sidhu US visit meet Pentagon officials
वॉशिंग्टन/इस्लामाबाद: भारताने "ऑपरेशन सिंदूर" मोहिमेत पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या संरक्षण प्रणालींचा प्रभावीपणे भेद केल्यामुळे, पाकिस्तान आता आपल्या संरक्षण धोरणात मोठा बदल करत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या वायुदल प्रमुख एअर मार्शल जहीर अहमद बाबर सिधू यांनी अमेरिकेला भेट दिली असून, ही भेट तब्बल दहा वर्षांनंतर पाकिस्तानच्या वायुदल प्रमुखांची पहिलीच अमेरिका भेट ठरली आहे.
या भेटीत एअर मार्शल सिधू यांनी अमेरिकेचे वायुदलप्रमुख जनरल डेव्हिड ऑल्विन यांच्यासह पेंटागॉनमधील वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि स्टेट डिपार्टमेंटच्या प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. संरक्षण सहकार्य, तंत्रज्ञान आधारित लष्करी देवाणघेवाण आणि परस्पर संचालनक्षमतेवर (interoperability) यावेळी सखोल चर्चा झाल्याचे समजते.
विश्वसनीयतेच्या प्रश्नावर चिनी उपकरणांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने पाकिस्तान आता अमेरिकेच्या अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाकडे वळल्याचे समजते. विशेषतः F-16 ब्लॉक 70 फायटर जेट्स, AIM-7 स्पॅरो एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे आणि HIMARS (High Mobility Artillery Rocket System) प्रणाली पाकिस्तानच्या खरेदी यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
"ऑपरेशन सिंदूर" दरम्यान भारताने चिनी बनावटीच्या HQ-9P आणि HQ-16 क्षेपणास्त्र प्रणालींना लक्ष्य करत त्यांचं संपूर्णपणे उच्चाटन केलं. भारताचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हे पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या संरक्षण व्यवस्थेला चकवा देत देशाच्या आतील भागात लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाले. यामुळे पाकिस्तानमध्ये चिनी उपकरणांच्या विश्वासार्हतेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे.
पाकिस्तान आणि चीनमधील जवळीक ही अमेरिकेसाठी कायमच चिंता राहिली आहे. गेल्या दशकभरात पाकिस्तानने चीनशी धोरणात्मक भागीदारी वाढवली असली, तरी अलीकडील लष्करी अपयशानंतर पाकिस्तान पुन्हा अमेरिकेकडे झुकताना दिसतोय.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्याच पावलावर पाऊल टाकत वायुदलप्रमुखांची ही भेट भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या geopolitics चा भाग मानली जात आहे.
संरक्षण विश्लेषकांच्या मते, एअर मार्शल सिधू यांची ही अमेरिका भेट पाकिस्तानच्या चीनवरील अवलंबित्वात कपात करण्याचा आणि अमेरिकेशी संरक्षण भागीदारी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. या भेटीतून पाकिस्तानकडून अमेरिका आणि चीन यांच्यातील समतोल राखण्याची रणनीती स्पष्ट होते.
ही भेट केवळ लष्करी चर्चांपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण दक्षिण आशियातील सामरिक समीकरणांना दिशा देणारी ठरू शकते. चीनचा प्रभाव कमी करत, पाकिस्तान अमेरिकेकडून पुन्हा एकदा सामरिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.