

Bali ferry boat sink
बाली (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या जावा बेटावरून बालीकडे निघालेली एक फेरी बोट बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास समुद्रात बुडाल्याने किमान चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 38 जण अद्यापही बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
फेरीवर एकूण 65 लोक होते, त्यात 53 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते, असं फेरीच्या मॅनिफेस्टमध्ये नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा जास्त प्रवासी असतात.
फेरी बुडण्याचं कारण वाईट हवामान असल्याचं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. ही घटना फक्त 25 मिनिटांत घडली, असंही बचाव यंत्रणांनी स्पष्ट केलं.
बचाव पथकांनी खवळलेला समुद्र आणि 2.5 मीटर (8 फूट) उंच लाटा, जोरदार वारे आणि प्रवाहांमुळे अडथळा येत असतानाही शोधकार्य सुरू ठेवलं आहे. प्रारंभी खराब हवामानामुळे मदतकार्याला विलंब झाला, मात्र आता हवामान काहीसं सुधारलं आहे, असं स्थानिक बचाव यंत्रणांनी सांगितलं.
बोट जावा बेटावरील बान्युवांगी (Banyuwangi) येथून गिलिमानुक, बाली येथे जात होती. हा सुमारे 5 किमीचा प्रवास असून, साधारणतः एका तासात पूर्ण होतो. ही फेरी वाहने घेऊन जाणारी असून, त्यात 22 वाहने होती, त्यापैकी 14 ट्रक होते.
बचावलेल्यांपैकी चार प्रवाशांनी स्वतः फेरीवरील लाईफबोटचा वापर करून आपला जीव वाचवला आणि त्यांना गुरुवारी सकाळी पाण्यात आढळून बाहेर काढण्यात आलं.
या जहाजाला 67 लोक आणि 25 वाहने वाहून नेण्याची परवानगी होती, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले. शोधकार्य जोरदार लाटा आणि वाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करत आहे, असे राष्ट्रीय बचाव एजन्सीने सांगितले.
त्यांनी त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवला आहे आणि 13 पाण्याखालील बचावकर्मी तैनात केले आहेत.
राष्ट्रीय बचाव एजन्सी बसर्नासने दिलेल्या व्हिडिओत, एका व्यक्तीच्या मृतदेहाला मच्छीमारांच्या बोटीवरून किनाऱ्यावर नेताना दाखवले आहे. सर्व प्रवासी इंडोनेशियाचे आहेत, असे परिवहन मंत्रालयाने सांगितले.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियान्तो, जे सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी या घटनेबाबत तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद द्यायला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे तपास आणि मदतकार्य सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
इंडोनेशियात सागरी अपघात काही नवीन नाहीत. देशभरात 17000 हून अधिक बेटे असल्याने जलवाहतुकीचा मोठा वापर होतो. मात्र सुरक्षा नियमांतील हलगर्जीपणा आणि वाईट हवामान यामुळे अशा घटना वारंवार घडतात.
मार्च 2025 मध्ये बालीजवळ एक बोट उलटून ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला होता.
2022 मध्ये 800 हून अधिक प्रवासी असलेली फेरी दोन दिवस अडकली होती.
2018 मध्ये सुमात्रा बेटावरील तलावात फेरी बुडून 150 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
इंडोनेशिया हा 17000 पेक्षा जास्त बेटांचा देश असून, तिथे जलपर्यटन जहाजे खूप वापरली जातात, पण सुरक्षा नियम न पाळल्याने तसेच अनेकदा ओव्हरलोडमुळे जहाजांचे अपघात होतात.