

NVIDIA CEO जेन्सन हुआंग हे चिनी गुप्तहेरच्या कटाचे लक्ष्य होते. हा कट ॲलिस हुआंगउर्फ हुआंग ले नावाच्या व्यावसायिक महिलेने रचला होता,या वृत्तानंतर टेक जगतामध्ये खळबळ माजली आहे.
NVIDIA CEO Jensen Huang Affair Chinese Spy : "मी माझ्या पत्नीशी प्रतारणा केली आहे. माझ्या कृतीमुळे तिला आणि आमच्या मुलांना दुःख झाले आहे. मी जे काही केले, त्याला कोणतेही समर्थन नाही. मला मनापासून पश्चात्ताप होत आहे. त्यांना झालेल्या वेदनांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, केवळ माफी मागून मी केलेले कृत्य पुसले जाणार नाही. तसेच त्यातून होणारी टीकाही मान्य करतो," अशा शब्दांमध्ये जगातील आघाडीची 'टेक' कंपनी एनव्हिडिया कॉर्पोरेशन (NVIDIA Corporation)चे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सन हुआंग यांनी एका संशयित चिनी गुप्तहेरासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. तसेच या प्रकरणी होणाऱ्या चौकशीत सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये दिले आहे.
जेन्सन हुआंग हे मूळचे तैवानचे आहेत. ते वयाच्या नवव्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाले. सध्या अमेरिकेचे नागरिक असणारे हुआंग हे जगातील आघाडीची टेक कंपनी असलेल्या ‘एनव्हिडिया कॉर्पोरेशन’ (NVIDIA) चे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. १९९३ मध्ये वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्रांतीचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली एनव्हिडियाने ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलासह जागतिक टेक बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, रोबोटिक्स आणि स्वायत्त वाहनांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी करणाऱ्या हुआंग यांची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये गणना होते.
'द न्यूयॉर्क टाइम्स'ने २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं की, हुआंग हे एका चिनी गुप्तहेरच्या कटाचे लक्ष्य होते. या कटाचे समन्वय ॲलिस हुआंग उर्फ हुआंग ले नावाच्या एका व्यावसायिक महिलेने केले होते. तिने हुआंग यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते. ती एनव्हिडियाच्या प्रगत एआय चिप्स व गुप्त माहिती चीनच्या गुप्तचर विभागाला पुरवत होती. सिंगापूरस्थित डेटा सेंटर कंपनी 'मेगास्पीड'मधील उच्चपदस्थ अधिकारी आणि चिनी नागरिक असलेली ॲलिस ही चीनसाठी गुप्त माहिती पुरवत होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी स्पष्ट केले आहे.
जेन्सन हुआंग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये, संशयित चिनी गुप्तहेरासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. या ईमेलमध्ये, हुआंग यांनी नमूद केले की, त्यांना आपल्या कुटुंबाची आणि सर्व कर्मचाऱ्यांची माफी मागायची आहे.
जेन्सन हुआंग यांनी ईमेलमध्ये म्हटलं आहे की, "मी माझ्या कुटुंबाची आणि तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी माझ्या पत्नीशी प्रतारणा केली आहे. माझ्या कृतीमुळे तिला आणि आमच्या मुलांना दुःख झाले आहे. मी जे काही केले, त्याला कोणतेही समर्थन नाही. मला मनापासून पश्चात्ताप होत आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात, माझ्या कुटुंबाने मला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. मी प्रामाणिक राहावे, असे त्यांनी मानणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र मी त्यांचा विश्वासघात केला आहे. आम्ही उभारलेले आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या कृतीची आणि त्यामुळे झालेल्या वेदनांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, तसेच त्यातून होणारी टीकाही मान्य करतो."
माझे तुमच्यावर प्रेम आहे. मला ठाऊक आहे की, केवळ माफी मागून मी केलेले कृत्य पुसले जाणार नाही. मला आशा आहे की, आमचे कुटुंब पुन्हा सावरेल आणि कालांतराने मी तुमचा विश्वास पुन्हा मिळवू शकेन. एनव्हिडिया (NVIDIA) मधील माझ्या सहकाऱ्यांसोबत मी अनेक दशके काम केले आहे. तसेच आमच्या संचालक मंडळाला, भागीदारांना आणि जगभरातील भागधारकांना: तुम्ही माझ्याकडून अधिक चांगल्या वर्तनाची अपेक्षा ठेवता, आणि ती तुमची रास्त अपेक्षा आहे. एनव्हिडियाचे नेतृत्व करणे ही माझ्या आयुष्यातील एक मोठी संधी आणि सन्मान आहे. तुमची सेवा करणे आणि तुमच्या विश्वासाला पात्र ठरणे ही माझी जबाबदारी आहे. मात्र, मी या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देऊ शकलो नाही. मी एनव्हिडियाप्रती पूर्णपणे समर्पित आहे आणि तुमचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असेही हुआंग यांनी म्हटले आहे.
हुआंग हे चिनी गुप्तहेरीच्या कटाचे लक्ष्य होते. या कटाचे समन्वय ॲलिस हुआंग उर्फ हुआंग ले नावाच्या एका व्यावसायिक महिलेने केले होते, असे वृत्त समोर आल्यानंतर हुआंग म्हणाले होते की, "आम्ही आमच्या जीपीयूच्या त्यांच्या सर्व वापरांचा अभ्यास केला आहे आणि प्रत्येक वापराची मोजणी केली आहे. मला वाटते की अमेरिकन सरकारनेही तेच केले आहे. त्यांच्यासोबतचा त्यांचा संवाद हा चिनी ग्राहक आणि अधिकाऱ्यांसोबतच्या संवादासारखाच होता. त्या आता मेगास्पीडमध्ये नाहीत. आमचे संबंध, आमचा संवाद, हे सर्व मेगास्पीडशी संबंधित होते आणि ते सर्व पूर्णपणे सामान्य होते, त्यात काहीही असामान्य नव्हते." ॲलिस हुआंग यांच्याबद्दलच्या संशयाबद्दल अमेरिकन सरकारने त्यांना कोणतीही माहिती दिली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वृत्तमाध्यमांमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंतांच्या संदर्भात, एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने एक स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. मी या चौकशीचे समर्थन करतो. यासाठी पूर्ण सहकार्य करेन. माझे माझ्या देशावर आणि आमच्या कंपनीवर प्रेम आहे. एनव्हिडियाचे रक्षण करण्यासाठी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला पाठिंबा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अमेरिकन असल्याचा मला अभिमान आहे आणि मी कृतज्ञही आहे. माझ्या निर्णयांची जबाबदारी माझ्या कुटुंबाची नाही, तर ती माझी आहे. कृपया त्यांना खाजगी आयुष्य जगू द्या, असे आवाहनही हुआंग यांनी केले आहे.
"संस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग हे परदेशी गुप्तचर यंत्रणेच्या प्रयत्नांचे लक्ष्य बनले असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे, असे एनव्हिडिया कंपनीने जारी निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा किंवा कंपनीची गुपिते धोक्यात आली आहेत असे मानण्याचे त्यांच्याकडे कोणतेही कारण नाही, परंतु या चौकशीत सर्व उपलब्ध माहितीची तपासणी केली जाईल. संचालक मंडळ अमेरिकेच्या राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देते. एनव्हिडिया आणि तिच्या भागधारकांच्या हितासाठी सर्वोच्च आहे," असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी ही "कंपनीची अंतर्गत बाब" असल्याचे सांगून त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, संशयित चिनी गुप्तहेर ॲलिस हुआंग या मेगास्पीड कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बायडेन प्रशासनाच्या अखेरच्या काळात वाणिज्य विभागातर्फे या कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली होती, कारण ही कंपनी चीनला एनव्हिडियाच्या एआय चिप्स मिळवण्यासाठी अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यास मदत करत असल्याच्या चिंतेमुळे ही चौकशी सुरू झाली होती.