पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI वर नियंत्रण मिळवण्यासाठी आता स्पर्धा सुरु झाली आहे. आता चीनच्या एका नवीन एआय मॉडेलच्या एंट्रीने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. चीनचे एआय स्टार्टअप डीपसीक-आर१ ने (DeepSeek-R1) एक स्वस्त एआय मॉडेल आल्याचे पडसाद अमेरिकेतील शेअर बाजारातही उमटले. परिणामी सोमवारी, अमेरिकन चीप मेकर कंपनी एनव्हीडिया कॉर्पचे शेअर्स धडाधड कोसळले.
चीनच्या चॅटजीपीटी सारख्या स्वस्त एआय मॉडेल्सच्या पार्श्वभूमीवर चिपमेकर एनव्हीडियाचे शेअर्स १७ टक्क्यांनी घसरले. यामुळे त्यांच्या ५९३ अब्ज डॉलर्स बाजार भांडवलाचा काही मिनिटांतच चुराडा झाला. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या एनव्हीडिया कॉर्पच्या बाजार भांडवलात एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
चीनच्या हांगझोऊ येथील डीपसीक २०२३ पासून एआय मॉडेल्स विकसित करत आहे. पण हे एआय स्टार्टअप या आठवड्याच्या शेवटी अनेक पाश्चात्य देशातील गुंतवणूकदारांच्या रडारवर आले. जेव्हा त्यांचे मोफत डीपसीक आर१ चॅटबॉट ॲप (DeepSeek R1 chatbot) जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले. मोठ्या प्रमाणात नवीन यूजर्स याच्याशी जोडले गेल्याने डीपसीकला ॲप ऑनलाइन ठेवताना अडचणी आल्या. यामुळे या ॲपला आउटेजचा (बंद पडणे) सामना करावा लागला. यामुळे सदर कंपनीला केवळ चीनमधील फोन नंबर असलेल्या यूजर्संना साइनअप मर्यादित ठेवावे लागले.
जपानमध्ये मंगळवारी Nvidia चा पुरवठादार ॲडव्हान्टेस्टचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले. यामुळे त्यांचा या आठवड्यातील तोटा जवळपास १९ टक्क्यांपर्यंत पोहोचला. एआय-बॅकर सॉफ्टबँक ग्रुपच्या शेअर्समध्ये ५.५ टक्के घसरण झाली आहे. डेटा-सेंटर केबल मेकर फुरुकावा इलेक्ट्रिकचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. सोमवारी या दोन्ही शेअर्समध्ये आधीच मोठी घसरण झाली होती.
एनव्हीडिया घसरणीचा फटका नॅस्डॅक निर्देशांकाला सोमवारी बसला. हा निर्देशांक ३ टक्क्यांनी खाली आला. टोकियोपासून ते न्यूयॉर्कपर्यंत याचा परिणाम दिसून आला. दुसरा मोठा फटका चिपमेकर ब्रॉडकॉम इंकला बसला. त्यांचे शेअर्स १७.४ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट (MSFT.O) मध्ये २.१ टक्के घसरण दिसून आली. गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेटचे शेअर्स ४.२ टक्क्यांनी घसरले.
संशोधकांच्या म्हणणण्यानुसार, १० जानेवारी रोजी लाँच झालेले डीपसीक-व्ही३ मॉडेलमध्ये (DeepSeek-V3 model) प्रशिक्षणादरम्यान Nvidia च्या कमी क्षमतेच्या H800 चिप्सचा वापर करण्यात आला. त्यासाठी ६० लाख डॉलरपेक्षा कमी खर्च केला. गेल्या आठवड्यात रिलीज करण्यात आलेले डीपसीक-आर१ मॉडेल हे कामाच्या बाबतीत वापरण्यास OpenAI's o1च्या मॉडेलपेक्षा २० ते ५० पट स्वस्त आहे, असे डीपसीकच्या अधिकृत WeChat अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
डीपसीक हे चीनमधील एक ॲडव्हान्स्ड AI मॉडेल आहे. हांगझोऊ येथील डीपसीक नावाच्या रिसर्च लॅबने हे विकसित केले आहे. ते स्वस्त चिप्स आणि कमी डेटाचा वापर करतात, असा दावा कंपनीने केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे DeepSeek-V3 मॉडेल केवळ ५.६ दशलक्ष डॉलरमध्ये तयार करण्यात आले आहे. ओपनएआय (OpenAi), गुगल, मेटा यांनी त्यांच्या AI मॉडेल्सवर जो खर्च केला आहे त्यातुलनेत हा खर्च काहीच नसल्याचे सांगितले जाते.