

Nepal Tibet barrier lake flood threat : तिबेट-नेपाळ सीमेवर आलेल्या भीषण महाप्रलयापाठोपाठ आता आणखी एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, याच सीमाभागाच्या वरच्या भागात असलेला एक नैसर्गिक बांध असलेला तलाव (बॅरियर लेक) आगामी ७२ तासांत फुटू शकतो. हा तलाव चोचेन खोला (Chhochen Khola) आणि पुरेपु सांगपो (Purepu Tsangpo) नद्यांच्या संगमावर स्थित असून, चीनचे जलसंसाधन मंत्रालय यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
चीनच्या सरकारी वृत्तवाहिनी 'सीसीटीव्ही'च्या (CCTV) वृत्तानुसार, बीजिंगमधील अधिकाऱ्यांनी हिमालयीन सीमा क्रॉसिंगच्या वरच्या भागातील या तलावामुळे निर्माण झालेल्या धोक्याची ओळख पटवली आहे, ज्यामुळे बचावकार्यात अडथळा येऊ शकतो. आपत्तीच्या ठिकाणाच्या उत्तर-पूर्व भागात असलेल्या या तलावाची देखरेख वाढवण्यात आले आहे. बचावकार्यास मदत करणे आणि इतर अनुचित घटना रोखणे हा यामागचा उद्देश आहे.
गुरुवारपर्यंत या तलावातील पाण्याचा साठा सुमारे २० लाख घनमीटर इतका मोजण्यात आला असून, तो आधीपासूनच ओव्हरफ्लो होत आहे. हवामानाची सद्यस्थिती पाहता, पुढील तीन दिवसांत या तलावात आणखी सुमारे ३० लाख घनमीटर पाणी येण्याची शक्यता आहे. त्याचा बांध फुटण्याचा धोका अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याची भीती आहे. चिनी प्रशासनाने आगामी ७२ तासांसाठी तीव्र इशारा जारी केला आहे.
या नवीन धोक्यापूर्वीच नेपाळ-तिबेट सीमा भागात आलेल्या भीषण दरडी कोसळण्याच्या घटना आणि महापुरात हाहाकार उडला आहे. तिबेट क्षेत्रातून कमीत कमी ५५८ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळ सीमेच्या बाजूलाही सुमारे १०० चिनी नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी अचानक आलेल्या या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत ३३२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण बेपत्ता आहेत. पुराच्या तीव्र प्रवाहामुळे अनेक घरे, रस्ते आणि वीज प्रकल्प वाहून गेले आहेत. सीमेवळील जिइरोंग येथील ल्हेंदे नदीत माती आणि दगड कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
धोका लक्षात घेता तिबेटी भागातील संवेदनशील गावे रिकामी करण्यात आली आहेत. स्थानिक पोलीस आणि सैन्याला मदत करण्यासाठी चीनने बीजिंग आणि चेंगदूमधून विशेष अग्निशमन व बचाव पथके रवाना केली आहेत. सध्या जिइरोंग शहराच्या मध्यवर्ती भागातील वीज आणि दळणवळण सेवा पूर्ववत करण्यात आली आहे, परंतु सीमावर्ती बंदर परिसर अजूनही पूर्णपणे संपर्कातून बाहेर आहे. या संकटामुळे हिमालयीन क्षेत्रातील अस्थिर बर्फाच्छादित यंत्रणेचे धोके पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
नेपाळ आणि तिबेटमधील ही आपत्ती पहिलीच नाही. हिमालयातील अस्थिर होत चाललेली बर्फाची यंत्रणा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिक, पायाभूत सुविधा आणि पाणीपुरवठ्यासाठी मोठा धोका निर्माण करत आहे. ऑगस्ट २०२५ मध्येही या भागात अशाच प्रकारचा अचानक पूर आला होता, जेव्हा तापमानात वाढ झाल्यामुळे तिबेटमधील एका हिमनदीचा तलाव (ग्लेशियल लेक) ओव्हरफ्लो झाला होता. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि नेपाळ-चीन जोडणाऱ्या पुलासह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले होते.