

Panchkula Woman Murder Case : गळा चिरलेला असताना, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेने मृत्यूशी झुंज देत आपल्या शेवटच्या श्वासांसोबत कागदावर लिहिले, "माझा पतीच माझा मारेकरी आहे." चंडीगडजवळील पिंजोर भागात बुधवारी सकाळी ही काळीज पिळवटून टाकणारी थरारक घटना घडली. राजिंदर कौर (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे.
पंचकुला येथील राजिंदर कौर यांचे अब्दुलपूर कॉलनीत स्वतःचे बुटीक होते. बुधवारी सकाळी त्या बुटीकचे शटर वर उचलून बाहेर आल्या. त्यांच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्या पुन्हा बुटीकमध्ये गेल्या. काही सेकंदांतच गळ्याला हात लावून मदतीची याचना करत बाहेर आल्या. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत त्यांना तातडीने कालका रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती बुटीकमध्ये शिरून शटर खाली ओढताना दिसली. काही वेळातच तो बाहेर पडला आणि शटर आतून सहज उघडता येऊ नये अशा रीतीने घट्ट बंद करून निघून गेला. तो निघून गेल्यानंतर अवघ्या दोन-तीन मिनिटांत राजिंदर कौर यांनी अत्यंत धडपडत शटर वर उचलल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेला एक कागद सापडला. ग्राहकांच्या कपड्यांची मापे लिहिलेल्या याच कागदावर राजिंदर कौर यांनी हिंदी भाषेत आपल्या पतीचे नाव हत्यारा म्हणून लिहून ठेवले होते. याशिवाय, सासू, दोन नणंदा आणि मेहुणा हेदेखील आपल्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे त्यांनी या चिठ्ठीत नमूद केले आहे. राजिंदर कौर राठपूर कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होत्या. मागील काही दिवस त्यांचा पतीसोबत वाद सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. हत्येमागचे मुख्य कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून पंचकुला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत आरोपी राजिंदर कौर यांचा पती शाम याला अटक केली आहे. त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.