

Nepal PM Balen India Visit: नेपाळाचे तरूण पंतप्रधान बालेंद्र उर्फ बालेन शाह हे आपल्या पहिल्याच परदेशी दौऱ्यात भारताला भेट देण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये नुकतेच मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यादरमयानच नेपाळचे अर्थ मंत्री स्वर्णिम वागले यांनी गुरूवारी बालेन हे भारताचा दौरा करण्याची शक्यता वर्तवली. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की पंतप्रधान शाह याचा भारत दौरा हा या वर्षाच्या शेवटपर्यंत आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
काठमांडूमधील एका वृत्तसमुहाच्या समीटमध्ये बोलताना नेपाळचे अर्थमंत्री वागले यांनी सांगितलं की बालेन यांच्या भारत दौऱ्याबाबतच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत. मात्र त्यांना पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान पद स्विकारल्यानंतर शाह हे आपला पहिला परदेशी दौरा हा भारताच करतील.
स्वर्णिम वागले म्हणाले की, 'आम्ही पंतप्रधानांच्या परदेशी दौऱ्याची चर्चा सुरू केली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा पहिला परदेशी दौरा हा भारताचाच होणार आहे. आता फक्त तारीख निश्चित करणे बाकी आहे. मात्र मला आशा आहे या वर्षाच्या शेवटपर्यंत बालेन हे भारताचा दौरा करतील.'
नेपाळच्या अर्थमंत्र्याचे हे वक्तव्य अत्यंत महत्वाच्या क्षणी आलं आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर भीषण पूर आला होता. त्यामुळं नेपाळ सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. आतापर्यंत जवळपास ३८९ लोकांचा यात मृत्यू झाला असून जवळपास १५०० लोक अजून बेपत्ता आहेत. पाणी आणि गाळ वाहून आल्याने अनेक गावांचे रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले आहेत.
संकटाच्या या काळात भारत सर्वात पहिल्यांदा नेपाळच्या मदतीसाठी धावून आला आहे. भारताने लष्करी विमानांद्वारे पहिल्यांदा १० टन मानवी सहाय्यता आणि बचाव सामुग्री पोहचवली होती. त्यानंतर ३५.५ टनांची अतिरिक्त मदतीची खेप देखील विमानाने पाठवण्यात आली. परराष्ट्र मंत्र्यांनी गुरूवारी आपल्या वक्तव्यात भारत नेपाळच्या जनतेसोबत एकजुटीने उभा आहे असं सांगितलं. भारत शक्य ती सगळी मदत देणार असं आश्वासन देखील दिलं.