

काठमांडू; वृत्तसंस्था : काठमांडूहून तिमुरेकडे नियमित उड्डाण करत असताना नदीच्या खोऱ्यातून अचानक प्रचंड धुळीचे लोट उठताना दिसू लागले. सुरुवातीला दरड कोसळली असावी किंवा रस्तेबांधणीसाठी स्फोट झाला असावा, असे वाटले. मात्र काही क्षणांतच चित्र स्पष्ट झाले. चीनकडील नदीखोऱ्यातून काळ्या, चिखलयुक्त पाण्याचा महाप्रलय वेगाने नेपाळच्या दिशेने येत होता. पाण्यासोबत मोठमोठी झाडे, वाहने आणि मलब्याचे ढिगारे वाहून येत होते. काही क्षणातच हा प्रलय नेपाळच्या दिशेने घुसला आणि त्याने सारे काही उद्ध्वस्त करायला सुरुवात केली.
नेपाळ, चीन सीमेवरील तिमुरे परिसरात आलेल्या महाभयंकर पुराची आँखे देखी सांगणारा हेलिकॉप्टरचा पायलट आमेन बोडुकी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चिखल आणि पुराचे भयंकर रूप बोडुकी आकाशातून अनुभवत होते. ते सांगतात, भोटेकोशी नदीचे पात्र काही क्षणांतच बदलून गेले. पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटांसारखा पाण्याचा प्रचंड प्रवाह नदीखोऱ्यातून वेगाने पुढे सरकत होता. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्यासोबत आलेल्या माती, दगड, झाडे आणि वाहनांनी वाटेत येणारे सर्व काही गिळंकृत केले. आकाशातून हा विध्वंस पाहताना काही काळ पुराच्या प्रवाहाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरात धूळ आणि मलब्याचे प्रचंड ढग पसरल्यासारखे दिसत होते.
अंगावर फक्त कपडे उरले, प्यायला पाणीही नाही!
काठमांडू : अचानक वेगवान पाण्याचा लोंढा घरात घुसला. ते पाहून मी कुटुंबाला हाक मारली आणि आम्ही तत्काळ पळत जाऊन घराच्या गच्चीवर आश्रय घेतला. आता पिण्यासाठी घोटभर पाणीही उरलेले नाही. पिण्याच्या पाण्याचा हंडा होता, तिथे आता चिखल आहे. कुटुंबाचा जीव तर वाचला; पण आमच्याकडे आता फक्त अंगावरील कपडेच उरले आहेत. बाकी सगळं अनेक फूट चिखलाखाली गाडले गेले आहे... हे शब्द आहेत विधूर गावातील दीपिकाचे (बदललेले नाव). दीपिकासाठी बुधवारची सकाळी ९.३० ची वेळ एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती. ही आपबिती सांगताना दीपिकाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते.
अन् काही सेकंदांत पत्नी-मुलगा वाहून गेले
काठमांडू : काही काळ जमीन हलत असल्याचा भास झाला. यामुळे कोणताही विचार न करता पळायला सुरुवात केली. मागे वळून पाहिले तर पाण्याचा विशाल लोंढा आणि त्यामागे धुराचे साम्राज्य असे दृश्य दिसत होते. आम्हाला उंच भागाच्या दिशेने पळून जाण्यास सांगण्यात आले. परंतु माझ्यासारखे खूपच कमी लोक वेळेवर सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकले. या पुराने अवघ्या काही सेकंदांत अनेक लोकांना वाहून नेले. यात माझा १८ वर्षांचा मुलगा आणि पत्नीही बेपत्ता झाली... अशा शब्दांत रसुवा येथील मुख्य सीमा शुल्क (कस्टम) अधिकारी राजेंद्र ढुंगाना यांनी 'काठमांडू पोस्ट'कडे आपबीती व्यक्त केली.