

nepal green house stood firm amid dangerous flood video goes viral netizens says miracle
पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर सध्या नेपाळमधील पुराशी संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुराचे रौद्र रूप धारण केलेले पाणी वेगाने वाहत असतानाही एक हिरव्या रंगाचे घर मात्र मजबुतीने उभे असल्याचे दिसत आहे. तर रौद्ररूप धारण करून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असताना त्या दोन मजली घरात कुटुंबिय बाहेर गॅलरीत येउन पाहत असल्याचे दिसत आहे.
नेपाळमध्ये प्रचंड फ्लॅश फ्लडने हाहाकार
नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने हिमालयीन भागात मोठी हानी झाली. हिमनदी तुटणे आणि ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लडमुळे भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या खोऱ्यांमध्ये अचानक मोठ्या लाटा उसळल्या. पाणी, चिखल, दगड आणि मलब्याच्या प्रचंड प्रवाहाने अनेक घरे, झाडे, रस्ते आणि पूल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे वाहून नेले. या दुर्घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक प्रभावित झाले आहेत. या भीषण परिस्थितीत हिरव्या रंगाचे दोन मजली घर सोशल मीडियावर ‘चमत्कार’ म्हणून चर्चेत आले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल
इन्स्टाग्रामवरील @tranquiltruth24 या हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत एक पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगी असे कुटुंबातील सदस्य असहायपणे पाणी ओसरण्याची वाट पाहताना दिसत आहेत.
पुराच्या पाण्याने घराला चारही बाजूंनी वेढले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहानंतरही घराच्या संरचनेचे फारसे नुकसान झाल्याचे दिसत नाही. दरम्यान, ‘एक्स’वर @Deb_livnletliv या हँडलवरूनही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आजूबाजूला गढूळ पाणी आणि मलबा प्रचंड वेगाने वाहताना दिसतो. आसपासच्या इमारती आणि इतर बांधकामे वाहून जात असतानाही फिकट हिरव्या रंगाचे हे घर मात्र ठामपणे उभे असल्याचे दिसते.
लोक म्हणाले- ‘चमत्कारापेक्षा कमी नाही’
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. घरात अडकलेल्या कुटुंबाचे काय होणार, याबद्दल अनेकांना चिंता वाटू लागली. अनेक युजर्सनी या घटनेला ‘मिरॅकल’ म्हणजेच चमत्कार म्हटले, तर काहींनी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थनाही केली.
काही तासांनंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला. त्यात पाणी ओसरल्यानंतरही हे घर उभे असल्याचे दिसले आणि कुटुंबातील सदस्य सुरक्षित असल्याचेही दिसून आले. एक व्यक्ती घराच्या छतावरून कपडा हलवून मदतीचा संकेत देताना दिसत होता. त्यानंतर कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली.
घराच्या मजबुतीने युजर्सही झाले हैराण
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घराची मजबुती पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले. दोन्ही व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले असून युजर्सकडून आश्चर्य आणि दिलासा व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “अशा परिस्थितीत त्यांच्या मनात काय सुरू असेल? ते एकमेकांना निरोप देत असतील का किंवा आपल्यापैकी कोणी वाचले तर काय करायचे, याबद्दल चर्चा करत असतील? कोणीतरी त्यांची मुलाखत घेतली पाहिजे.”
दुसऱ्या युजरने लिहिले, “एवढ्या भीषण पुराच्या प्रवाहानंतरही हे घर उभे आहे. मजबूत बांधकाम किती महत्त्वाचे आहे, याचे हे उदाहरण आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले, “ज्याने ही इमारत बांधली आहे, त्याचे कौतुक केले पाहिजे.” चौथ्या युजरने लिहिले, “देवाचे आभार की हे घर पुरातून वाचले.”
डिस्क्लेमर : या बातमीतील माहिती सोशल मीडिया आणि विविध रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यांवर आधारित आहे. या दाव्यांच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.