

Nepal floods stranger saves students : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने अनेक शहरांसह गावांची दाणादाण उडवून दिली आहे. या जलप्रलयाच्या विदारक विळख्यातून समोर येणाऱ्या कहाण्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. अशीच एक थरारक पण ३७० हून अधिक जीव वाचवणारी घटना उत्तरगया पब्लिक स्कूलमध्ये घडली, जिथे एका अज्ञात व्यक्तीची एक हाक शेकडो विद्यार्थ्यांसाठी देवदूत ठरली.
बुधवारी सकाळी त्रिशूली बाजारापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बेत्रावती भागातील उत्तरगया पब्लिक स्कूलजवळ अचानक एक अज्ञात व्यक्ती धावत आली. "महापूर आलाय, पळा...!" असा आक्रोश करत या व्यक्तीने शाळेच्या दिशेने धोक्याचा इशारा दिला.
त्या अज्ञात व्यक्तीचे शब्द ऐकताच शाळेतील शिक्षक आणि ३७० हून अधिक विद्यार्थी सतर्क झाले. पूर आणि चिखलाचा प्रचंड प्रवाह मुख्य रस्ते आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करत असतानाच, क्षणाचाही विलंब न लावता मुलांनी आवारामागील डोंगराळ जंगलाच्या दिशेने धाव घेतली. बुधवारी सकाळी शाळेची वेळ नुकतीच सुरू झाली होती. हॉस्टेलमधील मुले न्याहारी करत असतानाच अचानक हा ओरडा ऐकू आला. प्रशासनाकडून कोणताही सायरन, स्वयंचलित संदेश किंवा अधिकृत इशारा मिळण्यापूर्वीच या अनोळखी माणसाचा आवाज मुलांपर्यंत पोहोचला होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ७ वी ते १० वीचे मोठे विद्यार्थी स्वतः जंगलाच्या दिशेने धावले. तर शिक्षकांनी चिखलातून वाट काढत लहान मुलांना सुरक्षित स्थळी नेले. काही लहान मुले धावू शकत नव्हती, तेव्हा शिक्षकांनी त्यांना थेट कडेवर उचलून घेत डोंगराचा रस्ता धरला.
शिक्षक सोमलाल डंगोल यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, "इतका भीषण पूर येईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला मुले फार लांब पळाली नाहीत. पण जेव्हा पाण्याचा वेढा पाहिला, तेव्हा मुख्य रस्त्याने पळणे अशक्य झाले होते."
या थरारात ३७० हून अधिक जणांचे प्राण वाचले असले, तरी एका कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. १० वीत शिकणाऱ्या आयुष तमांग या विद्यार्थ्याला सुरक्षित आणण्यासाठी त्याचे वडील नवराराज तमांग घराबाहेर पडले. "मी आयुषला घेऊन येतो," असे पत्नी मुंगसी तमांग यांना सांगून ते शाळेच्या दिशेने धावले. मात्र, दुर्दैवाने शाळेत पोहोचण्यापूर्वीच पुराच्या तीव्र प्रवाहात नवराराज वाहून गेले. इकडे त्यांचा मुलगा आयुष मात्र जंगलाच्या दिशेने पळाल्यामुळे सुखरूप वाचला.