

काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत रविवारी पुन्हा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तेथे हाय अलर्ट देण्यात आला आहे. सतत पडणारा पाऊस आणि वाढत्या जलपातळीमुळे स्थानिक नागरिक व बचाव पथकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनच्या सीमेवर भूस्खलनामुळे आणखी एक नैसर्गिक तलाव तयार झाल्याच्या वृत्ताने धोक्यात भर घातली आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत ७८१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे २,५०० नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांमध्ये ३२० परदेशी नागरिकांचा समावेश असून, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार २७५ हून अधिक भारतीय आणि १२८ मूळचे भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. पुरामुळे २२४ हून अधिक नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर काठमांडू आणि धुंचे येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
नेपाळ सरकारने शोध व बचाव मोहिमेसाठी जवळपास २०,००० सुरक्षा जवान तैनात केले असून हेलिकॉप्टरच्या मदतीने ४,५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भारताने नेपाळच्या मदतीसाठी ६८.५ टन साहित्य, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आधुनिक उपकरणे पाठवली आहेत. तसेच त्रिशुली जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी भारताचे ११ सदस्यीय बोगदा तज्ज्ञ पथक नेपाळी लष्करासोबत प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले आहे. पूरग्रस्तांसाठी नेपाळ सरकारने कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत आणि ३७ ट्रक अन्नधान्य वितरित केले आहे.
१) २६ ऑगस्ट रोजी हिमकडा कोसळल्याने आलेल्या महापुरात मृतांचा आकडा ७८१ वर पोहोचला असून सुमारे २,५०० जण अद्याप बेपत्ता.
२) भोटेकोशी नदीच्या पाणी पातळीत रविवारी पुन्हा वाढ झाल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
३) पुरामुळे १९ मोठे पूल वाहून गेले असून त्रिशुली नदीच्या उद्रेकामुळे काठमांडू-पोखरा जोडणारा पृथ्वी महामार्ग ठप्प.
४) भारताने नेपाळच्या मदतीसाठी ६८.५ टन मदतसाहित्य आणि ११ सदस्यीय तज्ज्ञ बचाव पथक पाठवले असून २७५ हून अधिक भारतीय अजूनही बेपत्ता किंवा संपर्क क्षेत्राबाहेर.
भोटेकोशी नदीच्या महापुरामुळे घर, वाहने आणि १९ वाहतूक पूल वाहून गेले आहेत. राजधानी काठमांडूला पश्चिम नेपाळ व पोखराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या पृथ्वी महामार्गाचा काही भाग त्रिशुली नदीने वाहून नेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याशिवाय रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यातील ३५४ मेगावॅट क्षमतेचे ८ कार्यरत आणि ५ निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्प बाधित झाले आहेत. विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो कामगार अडकले असून त्यांपैकी १९१ जणांची सुटका करण्यात आली आहे.
नेपाळ सीमेनजीक तिबेटमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा रविवारी १६ वर पोहोचला; तर ४९ भारतीयांसह ५४६ लोक अद्याप बेपत्ता आहेत, असे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ ऑगस्ट रोजी ग्यारोंग-नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन पोर्टला पुराचा मोठा तडाखा बसला. या ठिकाणी तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूंना शेकडो लोक वाट पाहात होते. तिबेटमधील ग्यारोंग काऊंटीमध्ये मदत आणि बचावकार्य राबवणाऱ्या चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी या विनाशकारी आपत्तीतील मृतांचा आकडा वाढून १६ झाला आहे. नेपाळमध्ये मृतांचा आकडा वाढून ७३४ झाला आहे, तर सुमारे २,५०० जण अद्याप बेपत्ता आहेत.