

Nepal Flood Death Toll : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. आज (दि. ३० ऑगस्ट) दुपारी ३ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पुरानंतर आतापर्यंत तब्बल ७८८ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. सर्वाधिक २६४ मृत्यू चितवन भागात झाले असून, नवलपरासी ईस्टमध्ये १९४, नवलपरासी वेस्टमध्ये १२०, गोर्खा ५८, नुवाकोट ५२, धाडिंग ५०, तनहुन ३७ आणि रसुवामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नेपाळच्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी'ने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, २५०२ नागरिक अद्याप बेपत्ता असून बाधित भागात वेगाने बचावमोहीम राबवली जात आहे. ओळख पटू न शकलेले मृतदेह देशभरातील २१ रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत.
बेपत्ता नागरिकांमध्ये स्थानिक जलविद्युत प्रकल्पातील ९३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय ५९२ परदेशी नागरिक आणि परदेशी पर्यटकांसोबत प्रवास करणारे १२७ नेपाळी नागरिकही गायब आहेत. बेपत्ता झालेल्यांच्या यादीत नेपाळ पोलीस, नेपाळ सैन्य, सशस्त्र पोलीस दल, सीमाशुल्क आणि इम्रिग्रेशन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतील २३९ जखमींवर उपचार सुरू असून आपत्तीग्रस्त भागात सहा सर्जिकल वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे, त्रिशूली ३A हायड्रोपावर प्रोजेक्टच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांमध्येही प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.
आपत्तीच्या काळात बचावकार्यासाठी जवळपास २०,००० सुरक्षा कर्मचाऱ्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. जमिनीवर कार्यरत पथकांनी आतापर्यंत ८,७३० जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हेलिकॉप्टरच्या ३६३ फेऱ्यांद्वारे ३,०८१ जणांना (ज्यात २३६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे) एअरलिफ्ट करण्यात आले असून, महापुरामुळे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या २७९ जणांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळ सरकारने तातडीने आपत्कालीन रोख मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये रसुवा आणि नुवाकोटसाठी प्रत्येकी १०-१० दशलक्ष एनपीआर (NPR), धाडिंगसाठी ५ दशलक्ष एनपीआर आणि १५ स्थानिक प्रशासनांसाठी एकूण ६७.५ दशलक्ष एनपीआरची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
उत्तरगया आणि धुंचे यांसारख्या तुटलेल्या संपर्क क्षेत्रांमध्ये अन्न, दळणवळण साधने आणि आपत्कालीन मदत पोहोचवण्यासाठी ५० वाहतूक वाहने व आठ हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. तसेच, मदतकार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी इंधनाचा साठा योग्य प्रकारे व्यवस्थापित केला जात असून काठमांडूहून पुरग्रस्त भागांत मदत साहित्य रवाना केले जात आहे. दरम्यान, त्रिभुवन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या शवगृहात (मॉर्च्युरी) मृतदेह आणले जात असल्याने, आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी तिथे मोठी गर्दी केली आहे.