Nepal Floods | देव तारी त्‍याला कोण मारी..! ४ दिवस चिखलाखाली दबलेली ७ वर्षांची ‘शिरगंगा’ जिवंत बाहेर

Nepal floods |
नेपाळमधील विनाशकारी महापुरानंतर चौथ्‍या दिवशी चमत्‍कार घडून एक सातवर्षीय मुलगी जिवंत सापडली. या चिमुकलीची काळजी घेताना जवान.
Published on
Updated on

काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळमध्ये जलप्रलयाने घडवलेल्या भीषण विध्वंसाला चार दिवस उलटले असतानाच शनिवारी बचाव पथकाला चमत्काराची अनुभूती आली. रसुवा जिल्ह्यातील गोसाईकुंड ग्रामीण नगरपालिका २ मधील तिमुरे येथे चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली सात वर्षांची शिरगंगा इचै मगर ही मुलगी जिवंत आढळली. तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देत राहिलेल्या या चिमुकलीला सशस्त्र पोलिस दलाच्या धुन्चे येथील कंपनी क्रमांक २०च्या पथकाने बाहेर काढले. तिच्या अंगावर चिखलाचा थर होता आणि ती जखमी अवस्थेत होती.

बचावानंतर शिरगंगाला तातडीने हेलिकॉप्टरने धुन्चे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी काठमांडूतील टीयू टीचिंग हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. या चिमुकलीच्या आई, वडिलांनाही याच महापुरातून यापूर्वीच वाचवण्यात आले होते. ग्लोबल आयएमई बँकेच्या तिमुरे शाखेत कार्यरत असलेले गीता इचाईमागर आणि लोकबहादूर इचाईमागर यांना बचाव करून उपचारासाठी काठमांडूला हलवण्यात आले होते. त्यामुळे चार दिवसांनंतर मुलगी जिवंत सापडल्याची बातमी तिच्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरली.

भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या परिसरात आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, तिमुरे परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल आणि ढिगारा साचला आहे. अशा परिस्थितीत मातीखाली दबलेल्या सात वर्षांच्या शिर्गंगाचा शोध लागणे आणि तिला जिवंत बाहेर काढणे ही बचाव मोहिमेतील अत्यंत हृदयस्पर्शी घटना ठरली आहे. मूळची अर्घाखाँची जिल्ह्यातील असलेली ही चिमुकली चार दिवसांनंतर पुन्हा आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहोचण्याच्या आशेने उपचार घेत आहे.

एका बाजूला मृत्यूचे तांडव होत असताना दुसऱ्या बाजूला या सात वर्षांच्या चिमुरडीला जीवदान मिळाले. एवढेच नव्हे तर तिच्या आई-वडिलांनाही वाचवले होते. त्या मुलीला या महाभयंकर प्रलयातून केवळ पुन्हा एकदा आयुष्यच मिळाले असे नव्हे तर, अखंड कुटुंबही प्राप्त झाले. यामुळेच देवाची करणी असे मानले जात आहे. चार दिवसानंतर बचावकार्यात बहुतांशवेळा शिथिलता येते; मात्र दैवी चमत्कार वाटावा अशा या घटना बचावपथकांचे मनोबल वाढवत असतात. यातून आणखी काही जणांचे प्राण वाचले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news