

नवी मुंबई: आत्तापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील ४०४ यात्रेकरू सुरक्षित असून त्यांपैकी ३३८ जणांशी संपर्क झाला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
१४३ यात्रेकरू राज्यात परतण्याच्या मार्गावर आहेत.१०६ जण नागपूरला सोमवारी पहाटे ४.३० वाजता पोहोचण्याच्या बेतात होते.
चीनच्या सागा-मानसरोवर परिसरातील ४१ जण सुरक्षित स्थळी परतले. राज्यातील ४५ जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने शनिवारी भारतीय हद्दीत प्रवेश केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या काळात ते चितवन येथे होते.
काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने लुंबिनीमार्गे त्यांना आणण्यात येत आहे. अयोध्या येथे पाेहोचल्यानंतर त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन केले जाणार असल्याचे महाजन म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालयाकडून शुक्रवारी अखेरपर्यंत चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केलेल्या १४९ भारतीय पर्यटक नागरिकांची यादी त्या-त्या राज्यांना पाठवण्यात आली आहे. हे पर्यटक लवकरच भारतात परतणार आहेत.
यामध्ये मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कोणत्याही यात्रेकरूंबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला कोणताही कॉल आलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर बसेस व प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येऊन या पर्यटकांना भारतात आणले जात आहे. नागपूर येथील १०६ जणांचा प्रवास शनिवारी बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने सुरू झाला.
बोरिवली, अंधेरीचे ८ पर्यटक अडकले
बोरिवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांचा अथवा त्यांच्या ग्रुपमधील इतरांचा मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने संवाद साधला गेलेला नाही. या पर्यटकांच्या मुंबईतील नातेवाइकांच्या संपर्कात प्रशासन आहे.