

Mexico's drug lord El Mencho killed:
नवी दिल्ली: मेक्सिकोमधील अत्यंत कुख्यात ड्रग लॉर्ड आणि शक्तिशाली 'जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल' चा नेता नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंट्स, जो 'एल मेंचो' या नावाने ओळखला जात होता, रविवारी पश्चिम मेक्सिकोमध्ये एका लष्करी कारवाईत मारला गेला. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ओसेगुएरा याला पकडण्यात आले होते, परंतु उपचारासाठी नेत असताना झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
एल मेंचो हा आधुनिक मेक्सिकोमधील सर्वात भयंकर आणि शक्तिशाली ड्रग लॉर्ड्सपैकी एक होता. ग्रामीण भागातून आणि गरिबीतून वर येत त्याने अत्यंत हिंसक अशा जागतिक गुन्हेगारी साम्राज्याचे नेतृत्व केले. तो एक माजी पोलीस अधिकारी होता, जो नंतर संघटित गुन्हेगारीकडे वळला. त्याच्या मृत्यूमुळे मेक्सिकन आणि अमेरिकन यंत्रणांनी अनेक वर्षांपासून सुरू ठेवलेल्या शोधाचा शेवट झाला आहे. त्याच्या मृत्यूच्या वेळी, अमेरिकेने त्याच्यावर १.५ कोटी डॉलर्सचे (सुमारे १२५ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले होते, ज्यामुळे तो जगातील फरार गुन्हेगारांपैकी एक होता.
'जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल' (CJNG) ही मेक्सिकोतील सर्वात शक्तिशाली आणि वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी संघटनांपैकी एक होती. मेंचोच्या हत्येमुळे संपूर्ण मेक्सिकोमध्ये मोठा हिंसाचार उसळला आहे. गुन्हेगारी गटांनी सुमारे १२ राज्यांमध्ये रस्ते अडवले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी जलिस्कोची राजधानी ग्वाडलहारा येथील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
भारताने मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेक्सिकोतील भारतीय दूतावासने सोमवारी भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि पुढील सूचनेपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. दूतावासने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट शेअर करून भारतीयांना ही विनंती केली आहे. त्यात म्हटले आहे की, "सुरक्षा ऑपरेशन, रस्ते जाम आणि गुन्हेगारी हालचालींच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर, जलिस्को राज्यासह तमाउलिपास, मिचोआकेनचे काही भाग, गुएरेरो आणि नुएवो लिओनमधील भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहावे." दूतावासने ऑपरेशन सुरू असलेल्या भागांत जाणे टाळणे, गर्दीपासून दूर राहणे, स्वतःची काळजी घेणे आणि घराबाहेर विनाकारण फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
तणावाच्या वातावरणामुळे पर्यटकांचे केंद्र असलेल्या 'प्वेर्तो वलार्टा' जवळील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या माहितीनुसार, कंट्रोलाडोरा वुएला कंपानिया डे एविएशन SAB आणि ग्रुपो विवा एरोबस SAB ने काही काळासाठी आपली सेवा थांबवली आहे, तर शहराच्या दिशेने येणाऱ्या विमान कंपन्यांनी आपले मार्ग बदलले आहेत.