

झुरिच : जगातील बहुतांश देशांत आत्महत्येला कायद्याने बंदी असली, तरी काही देशांत इच्छामरणाला परवानगी आहे. स्वित्झर्लंड हा त्यापैकीच एक देश. तेथे आता इच्छामरण हवे असणार्यांसाठी एक सुसाईड कॅप्सूल बनवण्यात आली असून, या स्वयंचलित कॅप्सूलमध्ये प्रवेश करणार्या व्यक्तीला केवळ एक बटन दाबून इहलोकीपासून सुटका करून घेता येणार आहे. ते बटन दाबल्यावर अवघ्या पाच मिनिटांत मृत्यू येतो.
‘द लॉस्ट रिसॉर्ट’ या इच्छामरणाबाबत मदत करणार्या संघटनेने या कॅप्सूलची निर्मिती केली आहे. या संघटनेचे सीईओ फ्लोरियन विलेट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या कॅप्सूलचा वापर करण्यासाठी काही कायदेशीर बाबींची पूर्तता इच्छुकांना करावी लागेल. त्यात संबंधित व्यक्तीची मानसिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. त्या व्यक्तीच्या आजारपणाबाबत आणि त्याच्या बरी होण्याची शक्यता कितपत आहे अथवा नाही याची अधिकृत यंत्रणेकडून शहानिशा करूनच या कॅप्सूलचा वापर करू दिला जाणार आहे.
या इच्छामरणाच्या कॅप्सूलचा वापर करण्यासाठी वयाची अट 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे; पण जर एखादी 18 वर्षांची व्यक्ती खरोखरच गंभीर व मरणपंथाला लागली असेल, तर त्यासाठी वयाची अट शिथिल करण्याची तयारीही विलेट यांनी दर्शवली आहे. या कॅप्सूलच्या वापरासाठी 18 स्विस फ्रँक अर्थात 20 डॉलर एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले असून, ती किंमत नायट्रोजनची असणार आहे.
विलेट आणि या कॅप्सूलचे निर्माते फिलिप नित्शे यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडच्या शांत व निसर्गरम्य अशा भागात ही कॅप्सूल उपलब्ध करून देण्यात येणार असून, विकलांग व मरणाची प्रतीक्षा करणार्यांना शांत व निसर्गाच्या सान्निध्यात मृत्यू मिळावा, यासाठी जागा शोधल्या आहेत. आमच्या संघटनेकडे आतापासूनच विचारणा सुरू झाली असून, लवकरच आम्ही बुकिंग सुरू करणार आहोत.
गडद जांभळ्या आकाराची ही कॅप्सूल एखाद्या विज्ञानपटातील वाहनासारखी आहे.
त्यात स्पीकर आणि बटन देण्यात आले आहे.
त्यानंतर आत ऑक्सिजनऐवजी नायट्रोजनचा पुरवठा सुरू केला जातो.
30 सेकंदांत तेथील ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्क्यांवरून 0.05 टक्क्यावर येते.