

तेहरान : सोन्याच्या किमती ऐकून विस्फारावे लागत असेल तर एक मसाला असाही आहे, जो सोन्यापेक्षाही महाग मानला जातो. हा महागडा मसाला ‘रेड गोल्ड’ नावाने ओळखले जाते. या मसाल्याची किंमत इतकी आहे की, त्यासमोर सोनेदेखील खूपच स्वस्त वाटेल.
केशर हा जगातील सर्वात महाग मसाला आहे. केशर हे सुगंध, रंग आणि चव यासाठी ओळखले जाते. ही एक सुगंधी वनस्पती आहे. इरिडेसी कुटुंबातील क्रोकस सॅटिव्हस नावाची ही वनस्पती मूळची दक्षिण युरोपमधील आहे. त्याची लागवड स्पेन, इटली, ग्रीस, तुर्की, इराण, चीन आणि भारतात देखील केली जाते. इराण हा जगातील सर्वात मोठा केशर उत्पादक देश आहे. जगातील एकूण केशर उत्पादनापैकी सुमारे 90 टक्के उत्पादन फक्त इराणमध्येच होते. स्पेन, भारत, ग्रीस आणि इटली देखील केशर उत्पादन करतात, मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
आकडेवारीनुसार, इराण जगभरात उत्पादित होणार्या सुमारे 500 टन केशरांपैकी 450 टन पुरवठा करतो. दुसर्या क्रमांकावर असलेला भारत दरवर्षी सुमारे 25 टन केशर उत्पादन करतो. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा केशर उत्पादक देश आहे. भारतात याचे प्रमाण 7 टक्के इतके आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही भारतातील केशरचे प्रमुख उत्पादक राज्ये आहेत. त्यात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल हे प्रमुख आहेत.
क्रोकस सॅटिव्हस या फुलाच्या आतमधील लाल दोर ज्याला कुक्षी म्हणतात त्यापासून केशर मिळते. एक किलो केशर मिळवण्यासाठी 1,50,000 ते 2,00,000 फुले गोळा करावी लागतात आणि हे सर्व हाताने केले जाते. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड (चनाब व्हॅली) मध्ये सर्वात प्रीमियम आणि उच्च दर्जाचा केशर आढळतो. किश्तवार केशरची गुणवत्ता जगात कुठेही उगवल्या जाणार्या इतर केशरांपेक्षा चांगली आहे. याचमुळे केशराला पृथ्वीचे सोने म्हटले जाते.