Pakistan News: लाहोरमधील रस्ते आणि चौकांना पुन्हा मिळणार फाळणीपूर्वीची नावे; इस्लामपुरा बनणार कृष्ण नगर, काय आहेत जुनी नावे?

पाकिस्तानमधील पंजाब सरकारने लाहोर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा जिवंत करण्यासाठी रस्ते आणि चौकांना त्यांची फाळणीपूर्वीची मूळ नावे देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Pakistan Lahore
Pakistan LahoreFile photo
Published on
Updated on

Pakistan Lahore heritage project

लाहोर: पाकिस्तानमधील पंजाब सरकारने लाहोर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा जिवंत करण्यासाठी रस्ते आणि चौकांना त्यांची फाळणीपूर्वीची मूळ नावे देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांत बदलली गेलेली हिंदू आणि जैन समुदायाशी संबंधित जुनी नावे आता पुन्हा लाहोरच्या नकाशावर पाहायला मिळणार आहेत. या निर्णयानुसार प्रसिद्ध 'इस्लामपुरा' भागाचे नाव पुन्हा 'कृष्ण नगर' केले जाणार आहे.

मूळ ओळख पुसण्याचा प्रयत्न थांबणार

गेल्या काही वर्षांत लाहोरमधील अनेक ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलून त्यांना इस्लामिक, पाकिस्तानी किंवा स्थानिक मुस्लिम नेत्यांची नावे देण्यात आली होती. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत ही जुनी आणि ऐतिहासिक नावे पूर्ववत करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. "लाहोर शहराची सांस्कृतिक ओळख आणि फाळणीपूर्वीचा वारसा जतन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे," अशी माहिती पंजाब सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

Pakistan Lahore
Pakistan Iran support: पाकिस्तानचे अमेरिकेशी मध्यस्थीचे नाटक; इराणला चोरट्या मार्गाने नेमकी कशी मदत केली? वाचा सविस्तर

काय आहेत जुनी नावे?

'क्वीन्स रोड'चे नाव बदलून 'फातिमा जिन्ना रोड' करण्यात आले होते; 'जेल रोड'चे 'अल्लामा इक्बाल रोड', 'डेव्हिस रोड'चे 'सर आगा खान रोड', 'लॉरेन्स रोड'चे 'बाग-ए-जिन्ना रोड' आणि 'एम्प्रेस रोड'चे नाव बदलून 'शहराह-ए-अब्दुल हमीद बिन बादीस' असे करण्यात आले होते. तसेच 'कृष्णनगर'चे 'इस्लामपुरा', 'संतनगर'चे 'सुन्नत नगर', 'धरमपुरा'चे 'मुस्तफाबाद', 'ब्रँड्रेथ रोड'चे 'निशतर रोड' आणि 'टेम्पल स्ट्रीट'चे नाव बदलून 'हमीद निजामी रोड' असे करण्यात आले होते.

'लक्ष्मी चौक'चे नाव बदलून 'मौलाना जफर अली खान चौक', 'जैन मंदिर रोड'चे 'बाबरी मशीद चौक', 'राम गल्ली'चे 'रहमान गल्ली', 'कुंभारपुरा'चे 'गाझियाबाद' आणि 'आउटफॉल रोड'चे नाव बदलून 'जीलानी रोड' असे करण्यात आले होते.

नवाझ शरीफ यांची संकल्पना; जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली 'लाहोर हेरिटेज एरियाज रिव्हायव्हल प्रोजेक्ट' सुरू आहे. त्यांच्याच सूचनेवरून हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत मिंटो पार्क (सध्याचे ग्रेटर इक्बाल पार्क) येथील तीन ऐतिहासिक क्रिकेट मैदाने आणि एक पारंपारिक कुस्तीचे मैदान देखील पुनरुज्जीवित केले जाणार आहे. नवाझ शरीफ यांचे बंधू आणि तत्कालीन मुख्यमंत्री शेहबाज शरीफ यांनी २०१५ मध्ये एका विकासकामांतर्गत ही मैदाने आणि आखाडा उद्ध्वस्त केला होता, ज्यावर तीव्र टीका झाली होती. आता हा निर्णय म्हणजे त्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

लाला अमरनाथ आणि गामा पैलवानांच्या आठवणी

मिंटो पार्कच्या या मैदानांना मोठा इतिहास लाभला आहे. फाळणीपूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी याच मैदानावर सराव केला होता. १९७८ मध्ये जेव्हा लाला अमरनाथ भारतीय संघासोबत लाहोरला गेले होते, तेव्हा त्यांनी येथील 'क्रिसेंट क्रिकेट क्लब'च्या खेळाडूंसोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच, या पार्कमधील आखाड्याने गामा पैलवान आणि इमाम बख्श यांच्यासारखे जगप्रसिद्ध मल्ल देशाला दिले होते. विशेष म्हणजे, फाळणीपूर्वी लाहोरमधील हिंदू समाज याच मिंटो पार्कमध्ये दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असे.

Pakistan Lahore
West Bengal Assembly Elections | मोदी विरूध्द दीदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news