West Bengal Assembly Elections | मोदी विरूध्द दीदी

West Bengal Assembly Elections |
West Bengal Assembly Elections | मोदी विरूध्द दीदी
Published on
Updated on

डॉ. सुकृत खांडेकर

सर्व देशाचे लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणार्‍या ममता बॅनर्जींचे सरकार उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी होईल का? भाजपच्या महाप्रचंड शक्तीपुढे ममता बॅनर्जी पुरून उरतील का? अशा दोन प्रश्नांची या निवडणुकीत लढाई आहे. पश्चिम बंगालमधील जनतेचा कौल कुणाला, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

दि. 23 आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत या राज्यात विधानसभेच्या 294 जागांसाठी मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशा राजकीय संघर्षात यंदा महाविक्रमी मतदान झाले. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशा अटितटीच्या झालेल्या संघर्षात जनतेचा कौल कुणाला? भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंधू अधिकारी यांच्यातील महामुकाबल्यात कोण विजयी होणार ? या प्रश्नांची उत्तरे 4 मे रोजी होणार्‍या मतमोजणीनंतर मिळणार असली, तरी भाजपच्या झंझावाती प्रचारापुढे ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, असे चित्र दिसले. ममता या सलग पंधरा वर्षे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्या पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोलकत्याच्या रॉयटर्स बिल्डिंगमधे परतणार की राज्याच्या या प्रशासकीय मुख्यालयात भाजपचे कमळ उमलणार?

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात रस्त्यावर लढत होत्या. डाव्या आघाडीचे सरकार खाली खेचण्यासाठी जीवाचे रान करीत होत्या. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्या पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी अगतिक झालेल्या दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेसकडे नेत्यांची व वक्त्यांची मोठी फौज आहे. बंगाली जनतेला आकर्षित करू शकेल अशा नेत्यांची रांग आहे. बंगाली अभिनेता व अभिनेत्री मोठ्या संख्येने ममता यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. बंगाली भाषा, बंगाली अस्मिता व बंगाली संस्कृती हा त्यांच्या पक्षाचा आधार आहे. ‘जय श्रीराम’ अशा घोषणा भाजपच्या मिरवणुकांमध्ये नि प्रचारसभांमधे ऐकायला मिळतात; पण ममता बॅनर्जी व त्यांच्या पक्षांचे नेते, मंत्री, खासदार, सभांमध्ये ‘जय बांगला’ अशा घोषणा देऊन आपली नाळ बंगालच्या भूमीशी जोडलेली आहे, हे दाखवून देतात.

वाट्टेल ते करून यावर्षी पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आणायची व मुख्यमंत्री भाजपचा बसवायचा असा चंग पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बांधला आहे. ज्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, त्यांच्या बंगालमधे भाजपला सत्ता मिळू शकली नाही, याची बोच मोदी-शहांना आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून 2016 पासून भाजपाने पश्चिम बंगालची सत्ता आपल्या अजेंडावर घेतली आहे. ममता यांनी या राज्यातील डाव्या आघाडीची सलग 34 वर्षांची सत्ता 2011 मधे उलथवून लावली. मग, त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची 15 वर्षाची सत्ता हटवणे अशक्य आहे का, या प्रश्नाने भाजपला गेली दहा वर्षे गुंग केले आहे. ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व एककल्ली आहे, त्या हट्टी आहेत. राज्यात 30 टक्के मुस्लीम मतदार असून मुस्लीम व्होट बँकेच्या पाठिंब्याने त्या सत्ता टिकवून आहेत. मुस्लिमांचे तुष्टीकरण करताना त्या हिंदूंना कमी लेखतात, हिंदू सणासुदीवर निर्बंध लादतात. ममता यांच्या काळात बांगला देशातून घुसखोरी प्रचंड वाढली आहे. घुसखोरांना रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र या राज्यात सहज मिळू शकते. तृणमूल काँग्रेसचे संरक्षण असल्यामुळेच मुस्लिमांची अरेरावी वाढली आहे. मुस्लिमांवर सवलतींचा वर्षाव चालू आहे. हिंदू भयभित आहेत. महिला असुरक्षित आहेत. आरजी कार बलात्कार व हत्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा कसो बोजवारा झालाय, हे देशाला कळाले. अशा धुवाधार प्रचाराने भाजपने दोन महिने राज्य ढवळून काढले आहे. हिंदू मतदारांचा विश्वास संपादन करण्यावरच भाजपने निवडणुकीत भर दिला होता.

2014 मधे भाजपचे फक्त दोन खासदार पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून आले होते व 17 टक्के मते मिळाली. 2019 मधे भाजपचे 18 खासदार निवडून आले व 40.6 टक्के मते मिळाली. 2024 मधे 12 खासदार निवडून आले व भाजपला 39.1 टक्के मते मिळाली. 2016 मधे भाजपचे केवळ 3 आमदार पश्चिम बंगालच्या विधानसभेत निवडून आले होते. 2021 मध्ये भाजपचे 77 आमदार विजयी झाले व पक्षाला 38 टक्के मते मिळाली. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 150 मतदारसंघांवर आपले लक्ष्य केंद्रित केले होते. मोदी, शहा, राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्या सभांनी भाजपच्या प्रचारात जोश निर्माण केला. भाजपचे दीड डझन मुख्यमंत्री, पक्षाचे शंभरहून अधिक खासदार, विविध राज्यांतील चारशेहून अधिक आमदार, महामंत्र्यांपासून पन्नाप्रमुखापर्यंत पक्षाची सारी दमदार फौज निवडणूक काळात तैनात होती. केद्रीय सुरक्षा दलांचे साडेतीन लाख पोलीस कायदा सुव्यस्था चांगली राहावी म्हणून सतर्क होते. मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांपासून आयएएस व आयपीएस अशा पाचशेहून अधिक अधिकार्‍यांची निवडणूक आयोगाने अगोदरच बदली केली होती, तरीही मतदानाच्या काळात हिंसाचाराच्या काही घटना घडल्याच. केंद्रीय पोलिसांनी घरोघरी जाऊन तृममूलच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली तसेच मतदानासाठी घरातील लोकांवर दबाव आणला, असा आरोप ममता यांनी केला, तर ममता यांचा 30 हजार मतांनी पराभव होणार असे भाकीत त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुवेंधू अधिकारी यांनी वर्तवले आहे.

मोदी सांगत होते, तृणमूल काँग्रेसच्या अहंकाराला तडा गेला आहे. माँ, माटी, मानूषचा कुठे सन्मान राहिलेला नाही. तृणमूलमधील छोटा नेता स्वत:ला सरकार समजतो आहे. ममता यांना पक्षात घराणेशाही चालवायची आहे. भाजप राज्यात सत्तेवर आल्यावर 4 मेपासून तृणमूलची गुंडगिरी व दहशतवाद यांना लगाम बसणार आहे, बांगला देशी घुसखोरांना चाप लागणार आहे, हिंदूंना आत्मसन्मानाने जगता येणार आहे...

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला मोदी विरुद्ध दीदी असे राजकीय युद्धाचे स्वरूप आले आहे. ‘बंगाल जितकर भाजप को दिल्ली से हटाएंगे’ असे ममता प्रचारात सांगून मोदींनाच आव्हान देत होत्या. आपण राज्यात सत्तेवर आल्यावर भाजपचा दिल्लीत बदला घेणार असे त्या म्हणत होत्या. ममता यांची प्रतिमा स्ट्रीट फायटर अशीच आहे. रस्त्यावर आंदोलने करून, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन, अंगावर अनेक गुन्हे घेऊन युवक काँग्रेसची कार्यकर्तापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत त्या पोहोचल्या आहेत. अगोदर मार्क्सवादी कम्युनिस्ट व नंतर काँग्रेसविरोधात त्या लढल्या आणि आता मोदी- शहांच्या भाजपविरोधात लढत आहेत. केंद्र सरकार पश्चिम बंगालची सतत उपेक्षा करते, निधी देत नाही म्हणून मोदी सरकारवर त्या सतत संताप व्यक्त करीत असतात. त्यांनीही राज्यातील 2 कोटी 20 लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणारी लक्ष्मी भांडार योजना सुरू केली आहे. मुलींना सायकल देणार्‍या कन्याश्री योजनेची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. सुशिक्षित बेरोजगारांनाही दरमहा पंधराशे रुपये देणार आहेत. राज्यावरील कर्जाचा भार आठ लाख कोटींवर पोहोचला आहे. एसआयआरमध्ये (मतदार फेररचना) 91 लाख नावे वगळली गेली. त्याचा लाभ कुणाला होणार, हा संवेदनशील मुद्दा आहे. अँटिइन्कबन्सीचा ममता सरकारला फटका किती बसणार, हाही कळीचा मुद्दा आहे. भाजप सत्तेवर आली, तर राज्यातील जनतेला बांगला देशी ठरवले जाईल, मांसाहार व मासे खायला मनाई केली जाईल. बंगाली भाषा, अस्मितेवर गंडांतर येईल असा प्रचार ममता यांनी शेवटच्या टप्प्यात केला. भाजपवर टीका करताना ममता यांची चिडचिड दिसत होती. या निवडणुकीत भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोणी नव्हता आणि प्रचाराला बंगाली स्थानिक कोणी दणकट नेताही नव्हता. सारी निवडणूक मोदी, ममता आणि शहा यांच्या भोवती फिरत राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news