

Pakistan Iran military support
वॉशिंग्टन: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी एकीकडे मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानने अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत चोरवाटेने इराणला मोठी लष्करी मदत केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. इराणच्या लष्करी विमानांना पाकिस्तानने आपल्या एअरबेसवर आश्रय दिल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
'सीबीएस न्यूज'ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर लगेचच इराणने आपली अनेक महत्त्वाची लष्करी विमाने पाकिस्तानच्या रावलपिंडी येथील 'नूर खान एअरबेस'वर हलवली. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांपासून आपली लढाऊ विमाने वाचवण्यासाठी इराणने ती पाकिस्तानात लपवून ठेवल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामध्ये इराणच्या हवाई दलाच्या अत्यंत महत्त्वाच्या RC-130 या शोधक विमानाचाही समावेश होता.
या खुलाशानंतर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर ते म्हणाले की, "जर हा अहवाल सत्य असेल, तर मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेचा नव्याने गांभीर्याने विचार करावा लागेल." इस्रायलबाबत पाकिस्तानची भूमिका पाहता, त्यांनी इराणला अशी मदत करणे यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पाकिस्तान आणि तालिबानचा बचावात्मक पवित्रा
पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "नूर खान एअरबेस हा दाट लोकवस्तीच्या भागात आहे, तिथे अशा प्रकारे चोरीछुप्या विमाने उतरवणे अशक्य आहे," असा दावा पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, इराणची काही विमाने अफगाणिस्तानमध्येही उतरल्याच्या चर्चा आहेत. मात्र, तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने हे वृत्त फेटाळताना म्हटले की, इराणला त्यांची विमाने इथे पाठवण्याची कोणतीही गरज नव्हती.
चीनचा दबाव की मुत्सद्देगिरी?
पाकिस्तान सध्या 'बैलेंसिंग ॲक्ट' करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे अमेरिकेशी संबंध सुधारण्याचे आव्हान असताना, दुसरीकडे शेजारी देश इराण आणि सर्वात मोठा शस्त्रपुरवठादार देश चीन यांना नाराज करण्याची जोखीम पाकिस्तान घेऊ शकत नाही. चीनचे इराणशी असलेले जवळचे संबंध पाहता, पाकिस्तानने चीनच्या दबावाखाली इराणला ही गुप्त मदत केल्याची चर्चा आता आंतरराष्ट्रीय वर्तुळात सुरू आहे.