

वॉशिंग्टन/तेहरान: इस्त्रायल आणि अमेरिकेने रविवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला असून, खामेनेई यांचा उल्लेख "इतिहासातील अत्यंत क्रूर व्यक्ती" असा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांत युद्धाचा भडका उडाला असून इराणने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
शनिवारी इस्त्रायली लढाऊ विमानांनी तेहरानमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. खमेनी यांचे कार्यालय असलेल्या परिसराजवळच हे स्फोट झाले. ८६ वर्षीय खमेनी गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. इस्त्रायली संरक्षण मंत्री इस्त्रायल कात्झ यांनी या कारवाईचे वर्णन "धोका मुळासकट उपटून टाकणे" असे केले आहे.
खमेनी यांच्या निधनानंतर इराणनेही इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. तेल अवीवमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. इस्त्रायलमध्ये सध्या जागोजागी सायरन वाजत असून नागरिकांना तातडीने बंकरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले आहे, सर्व बाजूंना तणाव वाढू नये आणि संवाद आणि वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की इराणच्या सार्वभौमत्वाचा, सुरक्षिततेचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.