

इस्रायल आणि अमेरिकेने पुन्हा एकदा इराणच्या शांततापूर्ण आणि सुरक्षित अणू केंद्रांवर हल्ला केल्याची माहिती इराणचे राजदूत रेझा नजफी यांनी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीत दिली.
Iran nuclear site attack
तेहरान: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर सुरु केलेल्या लष्करी कारवाई आज (दि. २ मार्च) अधिक तीव्र झाली आहे. इराणच्या नातान्झ अणू केंद्रावर इस्रायलचा भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात किरणोत्सर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली असून, आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेने (IAEA) या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अणू देखरेख संस्थेतील (IAEA) इराणचे राजदूत रेझा नजफी यांनी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीत माहिती दिली की, "इस्रायल आणि अमेरिकेने पुन्हा एकदा इराणच्या शांततापूर्ण आणि सुरक्षित अणू केंद्रांवर हल्ला केला आहे," यावेळी कोणता प्रकल्प बाधित झाला, अशी विचारणा करण्यात येताच त्यांनी नातान्झू अणु केंद्रावर हल्ला झाल्याचे सांगितले.
आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सध्याची स्थिती "अत्यंत चिंताजनक" असल्याचे म्हटले आहे. ग्रोसी यांनी इशारा दिला की, "अणू केंद्रातून किरणोत्सर्ग झाल्यास त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. मोठ्या शहरांएवढा किंवा त्याहूनही मोठा परिसर रिकामा करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, इराणच्या अणू नियामक प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेजारील देशांमध्ये अद्याप किरणोत्सर्गाची पातळी वाढल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, ही सध्या एकमेव समाधानाची बाब असल्याचे ग्रोसी यांनी सांगितले.
इस्रायल आणि इराण समर्थक हिजबुल्ला यांच्यातील वर्षभराचा युद्धविराम आज पहाटे संपला. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उपनगरांवर जोरदार हल्ले केले. यात किमान ३१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त लेबनीज प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येचा बदला म्हणून हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट डागले. इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात ११५ जणांचा मृत्यू झाला असून यात लहान मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे, कुवेतमध्ये ३ अमेरिकन सैनिक आणि इस्रायलमध्ये ९ नागरिक ठार झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमणावर हवाई हल्ले केले आहेत, तर इराणनेही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे संपूर्ण मध्य आशियामध्ये महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.