

वॉशिंग्टन : इराणवर संयुक्त हल्ला चढवण्यासाठी अमेरिका-इस्रायलने शुक्रवारी रात्रीचा मुहूर्त ठरवला होता. रात्रीच्या अंधारात क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत इराणची झोप उडवण्याचा त्यांचा बेत होता. तेवढ्यात अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी शनिवारी सकाळी एका बैठकीला उपस्थित राहणार असल्याची टीप दिली आणि या नियोजित हल्ल्याची वेळ ऐन वेळी बदलण्यात आली.
सीआयएची टीप साधी नव्हती. तेहरानच्या एका सरकारी इमारतीत शनिवारी सकाळी खामेनींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत असून, त्या बैठकीला इराणच्या संरक्षण खात्याचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सीआयएने कळवले. सीआयएने दिलेल्या यादीत खामेनींशिवाय
इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद पाकपौर, संरक्षण मंत्री अजिज नसीरजादेह, लष्करी परिषदेचे प्रमुख अली शमखानी, इराणच्या हवाई दलाचे कमांडर सय्यद माजिद मौसावी आणि गुप्तचर खात्याचे मंत्री महोम्मद सिराजी यांची नावे होती.
गेल्या कित्येक महिन्यांपासून सीआयए खामेनींच्या मागावर होती. शुक्रवारी रात्री इराणवर हल्ले सुरू होण्याच्या काहीच मिनिटे आधी सीआयएला खामेनींच्या शनिवारच्या बैठकीची पक्की खबर लागली.
इराणचे बडे अधिकारी व मंत्री जिथे जमणार होते त्या आवारात इराणच्या राष्ट्रपतींचे कार्यालय, खुद्द खामेनींचे कार्यालय आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचेही कार्यालय असल्याने एकाच क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक टार्गेट खतम करण्याची संधी चालून आल्याचे सीआयएने ओळखले. ही टीप मिळताच अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त फौजांनी घड्याळ्याचे काटे फिरवले आणि इराणवर हल्ल्यासाठी शनिवारचा मुहूर्त ठरवला.
शनिवारी सकाळी इस्रायली जेट्स इराणच्या अवकाशात दाखल झाले. स्थानिक वेळेनुसार, बरोबर 9 वाजून 40 मिनिटांनी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तेहरानच्या मध्यवर्ती भागातील सरकारी इमारतींच्या संकुलावर आदळली. त्यावेळी इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अधिकारी आपल्या इमारतीतच होते आणि शेजारच्याच इमारतीत सर्वोच्च नेते खामेनी बसलेले होते. या दोन्ही इमारतींसह तेहरानमधील अनेक इमारतींवर एकाच वेळी क्षेपणास्त्र हल्ले चढवले गेले. कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होणार म्हणून इराणचे लष्कर सज्ज होते. मात्र, या अचानक नेमक्या हल्ल्याने इराणही भयचकित झाला. खामेनी उपस्थित असलेली इमारत क्षणार्धात उद्ध्वस्त झाली.
खामेनी ठार झाल्याची पहिली बातमी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यान्याहू यांनी दिली. या हल्ल्यात खामेनी खतम झाले असावेत, लक्षणे तशीच दिसतात, असे नेत्यान्याहू म्हणाले. इराणने मात्र हा दावा आधी फेटाळला. रविवारी मात्र खामेनी ठार झाल्याचे इराणला मान्य करावे लागले. त्यासोबतच शमखानी आणि पाकपौर हे दोन बडे लष्करी अधिकारीही ठार झाल्याचे इराणने जाहीर केले.
गेल्या वर्षी 13 ते 24 जून दरम्यान इराणसोबत झालेल्या 12 दिवसांच्या युद्धाचा अनुभव सीआयएने पुरेपूर वापरला. युद्धजन्य स्थितीत इराणचे गुप्तचर अधिकारी कुठे असतात, सर्वोच्च नेते खामेनी कुठे दडून बसतात, त्यांच्या बैठका कशा होतात, याची बित्तंबात सीआयएने मिळवली आणि यावेळी याच माहितीचा वापर करत शनिवारी होणाऱ्या बैठकीची टीप अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त फौजांना दिली.