
Israel Iran conflict
इस्रायल- इराण यांच्यात सलग नवव्या दिवशी संघर्ष सुरु आहे. दरम्यान, इस्रायलने इराणच्या इस्फहान अण्वस्त्र संशोधन संकुलावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. इस्फहान येथे इराणच्या सर्वात मोठ्या अण्वस्त्र संशोधन केंद्राचे मुख्यालय आहे. या ठिकाणाला यापूर्वीही इस्रायलने लक्ष्य केले होते.
इस्रायलने इराणच्या इस्फहान अण्वस्त्र ठिकाणाला लक्ष्य केले आहे. पण यामुळे कोणताही धोका निर्माण झालेले नाही, असे वृत्त इराणमधील फार्स न्यूज एजन्सीने दिले आहे.
इस्फहान प्रांतातील इतर अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. पण यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे इस्फहान प्रातांचे डेप्युटी गव्हर्नरनी म्हटले आहे. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलचे काही हल्ले परतवून लावल्याचा दावा इराणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे कोणत्याही धोकादायक पदार्थांची गळती झालेली नाही. पण रहिवाशांना हल्ला झालेल्या परिसरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन पथके त्यांचे काम करू शकतील.
इराणच्या सरकारी मीडियाच्या वृत्तानुसार, मध्य इराणच्या इस्फहान शहरात स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. शनिवारी मध्य इराणमधील कोम शहरात एका निवासी इमारतीवर हल्ला करण्यात आला. यात दोघांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मृतांमध्ये एका १६ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हा हल्ला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर झाल्याचे सांगण्यात आले आहे.
"इस्रायलच्या हवाई दलाने आता मध्य इराणमधील क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण सुविधांवर हल्ले सुरु केले आहेत," असे इस्रायलच्या लष्कराने त्यांच्या X अकाउंटवर म्हटले आहे.