
Israel Iran War updates
इस्रायल-इराण यांच्यात सलग आठव्या दिवशी संघर्ष कायम आहे. दोन्ही देशांनी परस्परांवर शुक्रवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले. इस्रायलने इराणमधील महत्त्वांच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. यात इस्रायलमधील रुग्णालयाचे नुकसान झाले.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी स्पष्ट केले आहे की, इस्रायल इराण विरुद्ध लष्करी कारवाई सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेच्या परवानगीची वाट पाहणार नाही. इराणमधील अण्विक ठिकाणांवर हल्ला करण्यास इस्रायलची लष्करी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
"आम्ही निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करू. त्यांच्या सर्व अण्विक ठिकाणांवर हल्ला करू. आमच्याकडे अशी कारवाई करण्याची क्षमता आहे," असा इशारा नेतान्याहू यांनी कान पब्लिक ब्रॉडकास्टरला हिब्रू भाषेतून दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिला.
दरम्यान, इस्रायल- इराण संघर्षात अमेरिकादेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धाची व्याप्ती वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराण विरुद्धच्या कारवाईत इस्रायल सोबत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय पुढील दोन आठवड्याच्या आत घेऊ, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इस्रायलने अमेरिकेच्या निर्णयाकडे लक्ष न देता त्यांनी इराणवरील हल्ले तीव्र केले आहेत. "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आमच्यासोबत सहभागी होऊ इच्छितात की नाही, हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे," असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
गुरुवारी इस्रायलने इराणच्या अराक हेवी वॉटर रिॲक्टरवर मोठा हल्ला केला होता. पण यामुळे किरणोत्सर्गाचा धोका नसल्याचे सांगण्यात आले होते. कारण या हल्ल्यापूर्वीच हे ठिकाण रिकामे केले होते. तर इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालयावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांनी, इराणला रुग्णालयावरील हल्ल्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.