
Israel Iran Conflict Cluster bomb missile strike
तेहरान/जेरुसलेम : इराणने 19 जून रोजी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचे समोर आले आहे. इस्रायली संरक्षण दल (IDF) ने एक प्रक्षेपणास्त्र क्लस्टर बॉम्ब वॉरहेडसह लाँच केले होते. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे, कारण क्लस्टर बॉम्ब हे युद्धात अत्यंत वादग्रस्त आणि नागरिकांसाठी प्राणघातक मानले जातात.
क्लस्टर बॉम्ब ही अशी शस्त्रप्रणाली आहे जी एकाच वेळी अनेक लहान बॉम्ब किंवा "सबम्युनिशन्स" मोठ्या क्षेत्रावर पसरवते. हा बॉम्ब सामान्यतः हवेत बहुतेक वेळा उंचीवर – फुटतो आणि त्यातून 10 ते 20 किंवा त्याहून अधिक लहान स्फोटक बॉम्ब खाली जमिनीवर पसरतात.
हे छोटे बॉम्ब स्वतःहून मार्गदर्शित नसतात आणि सरळ खाली पडतात, जमिनीवर आदळल्यावर स्फोट होतो.
19 जून रोजी इराणकडून इस्रायलवर डझनभर क्षेपणास्त्र डागण्यात आली. त्यापैकी एका क्षेपणास्त्रामध्ये क्लस्टर वॉरहेड असल्याची माहिती मिळाली आहे. या बॉम्बचा स्फोट जमिनीपासून सुमारे 7 किमी उंचीवर झाला आणि त्यातून सुमारे 20 सबम्युनिशन्स 8 किमी परिघात विखुरले गेले.
या बॉम्बविषयीचा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे त्यांचा अनिर्वाचनीय (indiscriminate) वापर आणि अनेक वेळा स्फोट न झालेल्या लहान बॉम्बचा उरलेला धोका. अनेक वेळा हे लहान बॉम्ब जमिनीवर पडूनही फुटत नाहीत, मात्र ते सक्रिय राहतात. अशावेळी एखाद्या सामान्य नागरिकाने त्यांना हात लावल्यास किंवा जवळ गेल्यास जीवघेणा स्फोट होऊ शकतो.
या शस्त्रामुळे नासधूस मोठ्या प्रमाणावर होते. विशेषतः जर ते नागरी भागात वापरले गेले तर ते युद्ध संपल्यानंतरही लोकांच्या जिवाला धोका ठरू शकतात."
"टाईम्स ऑफ इस्रायल"च्या माहितीनुसार, या सबम्युनिशन्सपैकी एकाने इस्रायलमधील अझोर या शहरातील एका घरावर आदळून मालमत्तेचे नुकसान केले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
इस्रायलच्या गृह विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की, "अशा क्षेपणास्त्रांमुळे जमिनीवर स्फोटक वस्तू विखुरल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. कोणतीही अनोळखी वस्तू दिसल्यास तिला स्पर्श करू नका आणि त्वरित पोलिसांना माहिती द्या."
सामान्य क्षेपणास्त्र एका ठिकाणी मोठा स्फोट करते, तर क्लस्टर बॉम्ब एकाच वेळी मोठ्या परिसरात अनेक लहान स्फोट घडवतो. यामुळे त्याचा धोका नागरी भागात अधिक वाढतो, कारण लहान स्फोटके अनियमितपणे घसरतात आणि नागरिक, घरे किंवा सार्वजनिक पायाभूत सुविधा बाधित होतात.
2008 साली झालेल्या Convention on Cluster Munitions या आंतरराष्ट्रीय करारात या शस्त्रांच्या वापरावर, साठवणुकीवर, उत्पादनावर आणि व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. आजपर्यंत 111 देशांनी हा करार मान्य केला आहे. मात्र इराण, इस्रायल आणि अमेरिका यांसारख्या काही शक्तिशाली देशांनी हा करार मान्य केलेला नाही.
2023 मध्ये अमेरिकेने युक्रेनला क्लस्टर बॉम्ब पुरवले होते, जेव्हा रशिया विरुद्धच्या युद्धात त्यांची गरज भासली होती. युक्रेन आणि रशिया या दोघांनीही यापूर्वी असे शस्त्र वापरल्याचा आरोप एकमेकांवर केला आहे.
इराणने इस्रायलवर क्लस्टर बॉम्बने केलेला हल्ला म्हणजे या प्राणघातक शस्त्रप्रणालीचा एक नवा टप्पा आहे. युद्धाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर अशा शस्त्रांचा वापर झाल्यास सामान्य नागरिकांच्या जीवाला अधिक धोका निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने या विषयावर तातडीने विचार करणे गरजेचे आहे.