

Ayatollah Khamenei on conflict with Israel and America
तेहरान : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील 12 दिवस चाललेल्या युद्धानंतर अखेर शांती स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिका आणि इस्त्रायलवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. "इराणमधील इस्लामी प्रजासत्ताकाने अमेरिका आणि इस्त्रायलला जोरदार चपराक दिली आहे," असे खामेनेई यांनी या संघर्षानंतरच्या त्यांच्या पहिल्याच सार्वजनिक भाषणात म्हटले.
खामेनेई यांनी अमेरिकेला कडव्या शब्दांत इशारा दिला आहे की, इराण कधीच शरण जाणार नाही आणि भविष्यातील कुठलीही आक्रमक कारवाई अमेरिकेसाठी फार महागात पडेल.
या संघर्षात अमेरिका थेट युद्धात उतरली होती आणि तिने इराणमधील तीन अणुउद्योग केंद्रांवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील अमेरिकी लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला.
खामेनेई यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात म्हटले की, "संपूर्ण संघर्ष इराणच्या शरणागतीसाठी होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः स्पष्ट केलं की अमेरिकेचं अंतिम ध्येय इराणची शरणागती आहे. अणुउद्योग, क्षेपणास्त्रं हे फक्त निमित्त आहेत. पण शरणागती कधीही होणार नाही."
त्यांनी पुढे सांगितले, "इराणने अमेरिकी सैन्याच्या अल-उदायद तळावर हल्ला करून एक जोरदार संदेश दिला आहे. ही कारवाई पुन्हा होऊ शकते. शत्रूनं आक्रमण केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल."
खामेनेई यांनी दावा केला की, "अमेरिकेने युद्धात सामील होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेला वाटले होते की त्यांनी हस्तक्षेप न केल्यास इस्त्राईलचे पूर्णतः पतन होईल, म्हणूनच त्यांनी युद्धात उडी घेतली. पण त्यांना काहीही हाती लागले नाही.
इस्रायलमधील झायनिस्ट शासन अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. आता यापुढे कुठलीही आक्रमकता सहन करणार नाही, शत्रूंना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.”
तसेच "इराणने अमेरिकेच्या चेहऱ्यावर जोरदार थोबाडीत मारली आहे. आमचे राष्ट्र अभिमानी आहे, सामर्थ्यवान आहे आणि आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही." असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
इस्रायलच्या युद्ध कारवाईनंतर खामेनेई हे काही काळ एका सुरक्षित बंकरमध्ये होते. याच दरम्यान अमेरिका थेट युद्धात उतरली आणि 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' अंतर्गत तिने इराणमधील तीन अणुघटकांवर बी-2 बॉम्बर्सच्या साहाय्याने हल्ले केले.
हे प्रकरण अत्यंत गंभीर बनलं होतं आणि संपूर्ण क्षेत्रात युद्धप्रसंग उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, इराणने अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्याआधी सूचित केल्यामुळे जीवितहानी झाली नाही. ट्रम्प यांनी यावर उत्तर न देण्याचा निर्णय घेतला आणि काही तासांतच अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केली.
दरम्यान, खामेनेई यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
सीएनएनच्या एका गुप्त अहवालानुसार अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर काही महिन्यांचा परिणाम झाला, मात्र फार मोठे नुकसान झाले नसल्याचे म्हटले जात आहे.
मात्र अमेरिका आणि इस्त्राईलचे दावे याउलट असून, ट्रम्प यांनी "इराणचे अणुठिकाणे दशकांपर्यंत उभारी घेऊ शकणार नाहीत" असे सांगितले.
CIA प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांच्या मते, “काही प्रमुख अणुस्थळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ती पुन्हा उभारायला अनेक वर्षे लागतील.”
युद्धातील जीवितहानी
इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये 627 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून, इराणच्या हल्ल्यांत इस्त्रायलमध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत आकडेवारीत सांगण्यात आले आहे. शहीद वैज्ञानिक आणि लष्करी अधिकाऱ्यांसाठी शनिवारी तेहरानमध्ये राज्य अंतिम संस्कार होणार आहेत.