

Donald Trump psychopathic behavior : अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामासाठी झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनाचा अंदाज घेण्यासाठी इराणने मानसोपचारतज्ज्ञांची (Psychologists) मदत घेतली होती, असे वृत्त 'ड्रॉप साइट' (Drop Site)ने दिले आहे. चर्चेदरम्यान ट्रम्प यांच्या वर्तनाचा योग्य अंदाज घेता यावा आणि चर्चा सकारात्मक दिशेने पुढे नेण्यासाठी इराणने हा अनोखा मार्ग अवलंबला होता, असेही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते.
'ड्रॉप साइट'ने एका इराणी अधिकाऱ्याचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात इस्लामाबाद येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर तेहरानने आपल्या सल्लागार समितीमध्ये दोन "वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञांचा" समावेश केला होता.दोन्ही देशांकडून सामंजस्य कराराचे (MoU) प्रस्ताव एकमेकांना पाठवले जात असताना, प्रादेशिक मध्यस्थांमार्फत ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचवले जाणारे संदेश कसे असावेत आणि त्यांच्या वर्तनाचा अंदाज कसा घ्यावा, याबाबत इराणी शिष्टमंडळाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या तज्ज्ञांवर होती.
"आम्ही आमच्या सल्लागार समितीत दोन वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश केला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या 'सायकोपॅथिक' (उन्मादी ) वर्तन पद्धतीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, त्यांना पाठवले जाणारे संदेश योग्य प्रकारे तयार करणे हा यामागचा उद्देश होता," असे या इराणी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये इस्लामाबादमधील पहिल्या फेरीनंतर या मानसोपचारतज्ज्ञांनी काम सुरू केले होते. त्यांच्या शिफारशींचा इराणच्या लेखी संवादात आणि वाटाघाटींच्या रणनीतीमध्ये समावेश करण्यात आला. हा बदल केल्यानंतर ट्रम्प यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया अधिक सकारात्मक आणि रचनात्मक झाल्याचा दावाही या सूत्राने केला आहे. "आम्ही या सल्लागारांच्या शिफारशींनुसार संदेश आणि लेखी संवाद पाठवण्यास सुरुवात केल्यापासून, ट्रम्प यांच्या प्रतिक्रियांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली."
या चर्चेदरम्यान झालेला सर्व संवाद भविष्यात एक ऐतिहासिक दस्तऐवज बनू शकतो, याची जाणीव इराणी शिष्टमंडळाला होते. हा सर्व मजकूर पुढे जाऊन इतिहासाचा भाग बनणार आहेत. त्यामुळे आगामी काळात हा संवाद सार्वजनिक झालाच, तर दोन्ही बाजूंच्या वाटाघाटींच्या कौशल्याची आणि परिपक्वतेची पातळी जगाला स्पष्ट दिसावी, अशा पद्धतीने आम्ही ही चर्चा हाताळली," असेही इराणी अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत ट्रम्प यांचे आरोग्य आणि त्यांच्या निर्णयक्षमतेवर सतत चर्चा होत आहे. अशा वेळी 'ड्रॉप साइट'चा रिपोर्टसमोर आला आहे. 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने नुकतेच वृत्त दिले होते की, ट्रम्प यांच्या शेवटच्या वैद्यकीय तपासणीत २२ वैद्यकीय तज्ज्ञांनी भाग घेतला होता. ही संख्या मागील तपासण्यांच्या तुलनेत दुप्पट असून, कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची एकाच भेटीत तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.
अमेरिका आणि इराणच्या संबंधांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. रविवारीच ट्रम्प आणि इराणी अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि शत्रुत्व संपवण्यासाठी त्यांच्यात एका सामंजस्य करारावर प्राथमिक संमती झाली आहे. या करारावर १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे अधिकृतपणे स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.