

वॉशिंग्टन/तेल अवीव; वृत्तसंस्था : इराणसोबतच्या संघर्षाच्या भविष्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात फोनवर अत्यंत तणावपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त आहे. वॉशिंग्टन सध्या लष्करी कारवाईऐवजी राजनैतिक तोडगा काढण्यास प्राधान्य देत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन प्रसारमाध्यम ‘अॅक्सिओस’च्या वृत्तानुसार, मंगळवारी दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराणची लष्करी क्षमता आणि पायाभूत सुविधांना आणखी कमकुवत करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार लष्करी हल्ले करण्याची मागणी ट्रम्प यांच्याकडे लावून धरली. मात्र, ट्रम्प यांनी तेहरानसोबत शांतता करार करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांच्या आवाहनानंतर मंगळवारी होणारे नियोजित हल्ले पुढे ढकलण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
मध्यस्थ देश (कतार आणि पाकिस्तान) सध्या एका शांतता कराराच्या मसुद्यावर काम करत आहेत. ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सांगितले की, मध्यस्थ एका ‘लेटर ऑफ इंटेंट’वर काम करत आहेत, त्यामुळे संघर्ष अधिकृतपणे संपू शकतो. यानंतर 30 दिवसांचा एक विशेष वाटाघाटीचा काळ सुरू होईल, ज्यामध्ये इराणचा अणुकार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासह सागरी सुरक्षेवर चर्चा केली जाईल.
* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण सध्या करार आणि पुन्हा संघर्ष सुरू होण्याच्या अगदी सीमारेषेवर उभे आहेत.
* वाटाघाटी अपयशी ठरल्यास आणि योग्य उत्तरे न मिळाल्यास इराणविरुद्ध पुन्हा कधीही लष्करी कारवाई सुरू होऊ शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
* अमेरिकेच्या या मऊ भूमिकेमुळे आणि इराणच्या वेळकाढू धोरणामुळे इस्रायली प्रशासनात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.