Trump Middle East agreement | करारामुळे मध्य पूर्वेचे चित्र बदलेल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

होर्मुझ सामुद्रधुनी कायमस्वरूपी ‘टोलमुक्त’
trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.Pudhari
Published on
Updated on

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी. सी. : इराणबरोबर झालेल्या नव्या कराराचे वर्णन ‘मध्य पूर्वेतील सत्तासंतुलन बदलणारी ऐतिहासिक घटना’ असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या करारामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक कायमस्वरूपी टोलमुक्त राहील आणि इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखता येईल, असा दावा त्यांनी केला.

द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या सविस्तर दूरध्वनी मुलाखतीत ट्रम्प यांनी स्वतःला या नव्या भू-राजकीय घडामोडींचे प्रमुख शिल्पकार म्हणून सादर केले. लष्करी कारवाई, आर्थिक दबाव आणि राजनैतिक वाटाघाटी यांच्या एकत्रित वापरामुळे अमेरिकेने मध्यपूर्वेत आपले वर्चस्व अधिक मजबूत केले असल्याचा दावा त्यांनी केला. व्हाईट हाऊसमधून त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, यावर्षीच्या सुरुवातीला इराणवर करण्यात आलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर इराणी बंदरांवर घालण्यात आलेली नौदल नाकेबंदी यामुळे तेहरानला चर्चेच्या टेबलावर यावे लागले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्राथमिक करारानंतर येत्या शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये (जिनिव्हा) अमेरिकन आणि इराणी प्रतिनिधींमध्ये औपचारिक अणुचर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र, इराणने अंतिम अणुकरारावर सहमती दर्शवली नाही तर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.जर त्यांनी करार पूर्ण केला नाही, तर आम्ही पुन्हा कारवाई करू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

शी जिनपिंग आणि पुतीन यांचे कौतुक

ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दलही आश्चर्यकारकरीत्या सकारात्मक भूमिका घेतली. गेल्या महिन्यात चीन दौऱ्यावर गेलेल्या ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणी बंदरांची नाकेबंदी केली असताना चीनने त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. शी जिनपिंग पूर्णपणे सज्जन माणूस ठरला, ट्रम्प म्हणाले. त्यांनी नाकेबंदी मोडण्यासाठी युद्धनौकांच्या संरक्षणाखाली तेलवाहू जहाजे पाठवली नाहीत.त्यांच्या मते, चीन आणि रशियाने संयम बाळगल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली नाही आणि व्यापक आंतरराष्ट्रीय संघर्ष टळला.

मध्य पूर्वेचा ‘संरक्षक’ बनण्याची अमेरिकेची तयारी

इराण भविष्यातही धोका राहिला, तर अमेरिका संपूर्ण मध्य पूर्वेचा संरक्षक म्हणून काम करू शकते, असे त्यांनी सांगितले. त्याबदल्यात त्या प्रदेशातील उत्पन्नाचा काही हिस्सा अमेरिकेला मिळावा, अशी संकल्पना त्यांनी मांडली. ही कल्पना प्रत्यक्षात आली तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकन परराष्ट्र धोरणात मोठा बदल मानला जाईल. आजवर अमेरिका सुरक्षा हमी ही जागतिक स्थैर्यासाठी देते, अशी भूमिका घेत आली आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इतर मित्रदेश या संकल्पनेला पाठिंबा देतील का, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. होर्मुझ सामुद्रधुनीतून या अरुंद जलमार्गातून तेलाने भरलेली अनेक जहाजे बाहेर पडू लागली आहेत, अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली.

“तिसरा हल्ला त्यांना नको होता”

ट्रम्प यांच्या मते, या करारामागील सर्वात मोठा घटक म्हणजे अमेरिकेची लष्करी ताकद.त्यांना तिसरा हल्ला नको होता, ते म्हणाले.त्यांना जगायचे आहे.आणखी विनाशकारी कारवाईची भीती असल्यामुळेच तेहरानने चर्चेचा मार्ग स्वीकारला.आमच्या हल्ल्यांचा या करारावर प्रचंड परिणाम झाला. त्याशिवाय हा करार झाला नसता, असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news