

अमेरिकेने इराणच्या तीन अणुतळांवर हल्ला केल्यानंतर आता इराणने संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढणारा निर्णय घेतला आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ट्रेट ऑफ होर्मुझ (Hormuz Strait) म्हणजेच होर्मुझ सामुद्रधुनी (पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडणारा अरुंद सागरी मार्ग) बंद करण्याच्या प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. जाणून घेवूया या मोठ्या निर्णय भारतावर होणार्या परिणाम आणि उपाययोजनांविषयी.
दोन मोठ्या जलसाठ्यांना जोडणारा एक अरुंद जलमार्ग म्हणजे सामुद्रधुनी. पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडणारा अरुंद सागरी मार्ग असणार्या होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सवांत महत्त्वाच्या अडथळ्यांपैकी एक आहे. पर्शियन आखात आणि ओमानचे आखात या दोन मोठ्या जलसाठ्यांना होर्मुझची सामुद्रधुनी जोडते, जो पुढे अरबी समुद्राला मिळतो. त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर सुमारे ३३ किमी रुंद असलेला हा अरुंद कालवा इराणला (उत्तरेला) अरबी द्वीपकल्पापासून (दक्षिणला) वेगळे करतो. या मार्गाने जागतिक तेलाच्या सुमारे ३० टक्के आणि जगातील एक तृतीयांश एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) या सामुद्रधुनीतून दररोज वाहतूक केली जाते. तिच्या भौगोलिक स्थानामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीला कोणताही सागरी पर्याय नाही. इराण स्वतःच्या व्यापारासाठीही या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे आणि त्यात अडथळा आणल्यास त्याचे आणि त्याच्या मित्र देशांचेही नुकसान होईल. या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली, तर त्याचे परिणाम जगभरातील तेल आणि एलएनजी व्यापारावर होतील आणि किमती गगनाला भिडतील. तेलाच्या किमतीतील कोणत्याही चढ-उताराचा परिणाम इतर अनेक वस्तू आणि मालाच्या किमतींवर होतो. त्यामुळेच होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूकच बंद झाल्याचा याचा थेट फटका आशियातील राष्ट्रांना बसणार आहे.
भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी महत्त्वाची आहे. या अरुंद जलमार्गातून भारतात दररोज सुमारे २ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात होते. चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया हे होर्मुझमधून आशियाकडे जाणाऱ्या कच्च्या तेलाची प्रमुख ठिकाणे होती, ज्यांचा २०२४ मध्ये होर्मुझमधून होणाऱ्या एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीत एकत्रितपणे ६९% वाटा होता. त्यामुळे भारतावर याचा परिणाम नक्कीच होईल. भारत रशिया, अमेरिका, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतूनही तेल खरेदी करतो, त्यामुळे त्याला पुरेसे तेल आणि वायू मिळणार नाही असे नाही. समस्या किमतीतील चढ-उताराची असेल. कोणत्याही कमतरतेची भरपाई करण्यासाठी रशियापासून अमेरिका आणि ब्राझीलपर्यंतचे पर्यायी स्रोत भारताला उपलब्ध आहेत. रशियन तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वळवले जाते, जे सुएझ कालवा, केप ऑफ गुड होप किंवा पॅसिफिक महासागरातून येते. भारताचा गॅसचा मुख्य पुरवठादार कतार, पुरवठ्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी वापरत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाला तरी ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिकेतील भारतातील द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) चे इतर स्रोत होर्मुझची सामुद्रधुनी बंदनंतरही अबाधित राहतील.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असणार्या घडामोडींचा तेल पुरवठ्यावर कोणता परिणाम होणार, याबाबत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही पश्चिम आशियातील विकसित होणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारताने गेल्या काही वर्षांत कच्चे तेल पुरवठ्यात विविधता आणली आहे. पूर्वीप्रमाणे आता आमच्या पुरवठ्याचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही. तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा पुरवठा असतो. त्यांना अनेक मार्गांनी पुरवठा होत राहतो. आमच्या नागरिकांना इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू."
तेल आणि वायू याचा पुरवठा आणि अर्थव्यवस्था याचा थेट संबंध आहे. पुरवठ्यांमधील तफावत दिसल्यास जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढवू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी एका आठवड्यासाठी देखील बंद राहिली तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसेल. भारतावरही परिणाम होईल, असे अर्थतज्ञांनी म्हटले आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल आयात करत आहे, परंतु त्याचा फायदा सवलती आणि किमतीच्या ट्रेंडवर अवलंबून असतो.जर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $१०५ च्या पातळी ओलांडली, तर सरकार इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा आढावा घेण्याचा विचार करू शकते, असेही मानले जात आहे. चीन आपले बरेचसे तेल इराणकडून खरेदी करत असल्यामुळे, येथील वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत झाल्यास बीजिंगला इतर विक्रेत्यांकडे वळावे लागेल, ज्यामुळे किमतीचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल.