

नवी दिल्ली : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. त्यामुळे भारत सरकारने दोन्ही देशात राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून ११० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९० जम्मू आणि काश्मीरचे आहेत.
इराणमधील उर्मिया मेडिकल विद्यापीठात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना अगोदर इराणमधून आर्मेनियाला आणण्यात आले. त्यानंतर दोहा मार्गे ते दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.
ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराण आणि इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणले जाणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करुन म्हटले होते. त्यानुसार इराण आणि इस्त्रायलमधील भारतीय दूतावास भारतीय नागरिकांना सुरक्षित भागात स्थलांतरित करत आहेत. त्यानंतर त्यांना उपलब्ध आणि व्यवहार्य पर्यायांचा वापर करून मायदेशी परत आणले जाईल, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इराणमधील भारतीय नागरिकांना तेहरान येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर इस्त्रायलमधील भारतीयांना तेल अवीव येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाद्वारे संपर्कात राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.