

Hormuz Open Iran Reaction: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या सुरू असलेल्या मध्य पूर्व आशियातील युद्धाबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी इराणला हार्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर मोठ्या लष्करी कारवाईला सामोरं जावं लागेल अशी धमकी दिली होती. याचवेळी त्यांनी अपशब्द आणि शिवराळ भाषेचा देखील वापर केला होता. यानंतर आता इराणनं ट्रम्प यांच्या या वक्तव्याला आणि ४८ तासाच्या अल्टीमेटमला मजेशीर मात्र ट्रम्प यांची खिल्ली उडवणारं उत्तर दिलं आहे.
इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला मिश्र असं उत्तर दिलं. त्यांनी ट्रम्प यांची मागणी धुडकावू लावलीच त्याचबरोबर ट्रम्प यांची खिल्ली उडवत आमच्याकडून हार्मुझची किल्ली हरवली आहे असं उत्तर दिलं. इराणच्या अधिकाऱ्यांकडून ते हार्मुझच्या सामुद्रधुनीवर असलेलं नियंत्रण कायम राहणार असल्याचं सांगितलं.
इराणने युद्धात झालेल्या हानीची नुकसानभरपाई दिल्याशिवाय हार्मुझ पुन्हा खुलं केलं जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. दोन्ही बाजूंकडून माघार घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळं हे युद्ध महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हार्मुझ पुन्हा खुले करण्यासाठी मोठा दबाव टाकला जात आहे. हा मार्ग जागतिक तेल आणि गॅस वाहतुकीचा महत्वाचा मार्ग आहे. त्यांनी मंगळवारपर्यंतचा वेळ दिला असून जर असं झालं नाही तर इराणवच्या पॉवर प्लांट आणि वाहतुकीचे पूल यांना टार्गेट करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.
ते आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, 'मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रीज डे असेल. इराणमधील हे सर्व उद्ध्वस्त केलं जाईल. हार्मुझ सामुद्रधुनी खुली करा, तुम्ही वेडे लोक नरकात जाल. तुम्ही फक्त पाहाच. अल्लाकडे प्रार्थना करा.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी या आपल्या सोशल मीडिया पोस्टसमध्ये अनेक शिव्या देखील दिल्या आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या इराणमधील नागरी फॅसिलीटिंवर हल्ला करण्याचा अमेरिकेतूनच विरोध होत असून विरोधी पक्षाने इराणच्या नागरी ठिकाणांवर हल्ला करणे हा वॉर क्राईम आहे अशी टीका केली.