

Indonesia Earthquake Tsunami Fear: इंडोनेशियाला शक्तीशाली ७.४ रिक्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले असून हे धक्के इंडोनेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर बसल्यानं त्सुनामीची देखील शक्यता वर्तवली जात आहे. हे भूकंपाचा केंद्रबिंदू हा मोलुक्का समुद्रात ३५ किलोमीटर खोलवर आहे. या भूकंपाची नोंद युएस जिओलॉजिकल सर्वेने केली आहे.
या भूकंपाचे धक्के उत्तर सुलावेसी तसेच मनाडोच्या आसपास जाणवले. याबाबतची माहिती देताना शोध आणि बचाव अधिकारी जॉर्ज लिओ मर्सी रँनडँग यांनी एएफपीला देताना सांगितलं की, 'मनाडोच्या आसपास या भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
याचबरोबर भूकंपानंतर अनेक मॉनिटरिंग स्टेशनवर त्सुनामीच्या लाटा देखील डिटेक्ट झाल्या आहेत. बितूंगमध्ये लाटा २० सेंटीमीटरपर्यंत पोहचल्या आहेत. तर पश्चिम हलमाहेरा इथं लाटांची उंची २० सेंटीमीटरपर्यंत मोजण्यात आली आहे. याबाबतची माहिती इंडोनेशिया मेट्रॉलॉजी विभाग, क्लायमेटॉलॉजी, जिओफिजिक्स एजन्सीने दिली आहे.
होनोलुलूमधील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने दावाओमध्ये ५ सेंटीमीटर लाटांची नोंद केली आहे. याबाबत पॅसिफिक त्सुनामी वॉरिंग सेंटरने मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपानंतरचा त्सुनामी धोका आता टळला आहे.
मात्र असं असलं तरी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी, 'सध्याच्या घडीला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. विशेषकरून समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.' त्यांनी किनाऱ्यावरील रहिवाशांना संबंधित प्रशासन धोका पूर्णपणे टळला असल्याचे सांगत नाहीत तोपर्यंत सुमद्र किनाऱ्यावर परतू नका असा इशारा दिला आहे.
इंडोनेशिया हा भूकंप प्रवण क्षेत्रात मोडणारा देश आहे. त्यामुळे तिथं सातत्यानं भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक होत असतो.