

ChatGPT Murder Case : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर किती भयानक व विकृत वळण घेऊ शकतो, याचा अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रकार अमेरिकेत उघडकीस आला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यात एका १७ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलाने स्वतःच्याच आईची आणि १४ वर्षांच्या लहान भावाची निघृण हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. 'अर्जुन अरविंद' (वय १७, रा. ॲक्टन) अल्पवयीन मुलाचे नाव असून, मध्यरात्रीनंतर राबवलेल्या शोधमोहीमेनंतर बुधवारी पहाटे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन हा 'ॲक्टन-बोक्सबरो प्रादेशिक हायस्कूल'चा विद्यार्थी आहे. मंगळवारी राहत्या घरातच त्याने आई सुधा व्यंकटेशन (४५ वर्ष) आणि भाऊ सिद्धार्थ अरविंद (१४ वर्ष) जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो आईच्या कारमधून फरार झाला. बोस्टनपासून सुमारे ४८ किमी अंतरावर असलेल्या मार्था लेन येथील त्यांच्या घरात ही भयंकर घटना घडली. अर्जुनवर हत्येचे दोन गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार, प्राणघातक हल्ला, परवानगीशिवाय वाहन वापरणे आणि गाडी चोरी यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी सायंकाळी मुलांचा शिक्षक नेहमीप्रमाणे घरी आला, तेव्हा हे हत्याकांड उघडकीस आले. घर आतून बंद असल्याने आणि कोणीच दरवाजा उघडत नसल्याने ट्युटरने अर्जुनच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनीही पत्नी आणि मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तातडीने ॲक्टन पोलिसांना संपर्क साधून घराची पाहणी करण्याचे विनंती केली.
मिडलसेक्सच्या जिल्हा सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना घरातील दृश्य पाहून प्रचंड धक्का बसला. आई सुधा व्यंकटेशन यांचा मृतदेह घराच्या तळघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तर १४ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ याचा मृतदेह पहिल्या मजल्यावर आढळला.दोन्ही मृतदेहांवर गंभीर जखमा आणि आघातांच्या खुणा होत्या. हत्येचे नेमके कारण, मृत्यूची वेळ आणि आरोपीने कोणत्या शस्त्राचा वापर केला, याचा तपास वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस करत आहेत.
हत्याकांडानंतर अर्जुन आणि त्याची आईची कार गायब होती. पोलिसांनी तातडीने शोधमोहिम राबवली. बुधवारी पहाटे वेलँड (Wayland) येथील एका पार्किंग लॉटमध्ये अलार्म वाजल्याने पोलीस तेथे पोहोचले. तेथे पार्क केलेल्या कारमध्ये अर्जुन झोपलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणातील सर्वात भयंकर आणि धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. आरोपी अर्जुन गेल्या काही दिवसांपासून अत्यंत विचित्र आणि हिंसक वर्तणूक दाखवत होता. जिल्हा सरकारी वकील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, "अर्जुन 'ChatGPT' या AI टूलचा वापर करून स्वतःच्याच कुटुंबाला ठार मारण्याच्या कल्पनेचा शोध घेत होता." इतकेच नव्हे, तर त्याने या एआय चॅटबॉटला 'रहस्यमयी कादंबरी' सारख्या कथा लिहिण्यास आणि त्यासाठी हिंसक पात्रे तयार करण्यास सांगितले होते.
आरोपी अर्जुनला बुधवारी लोवेल ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, अल्पवयीन न्यायालयाला हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सुनावणीचे थेट अधिकार नसल्याने, पुढील खटला कॉनकॉर्ड डिस्ट्रिक्ट कोर्टात चालवला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आपल्या कुटुंबाच्या जीववार उठलेल्या अल्पवयीनमुळे भारतीय समुदायासह अमेरिकेतही मोठी खळबळ उडाली आहे.